Tuesday, October 05, 2010

रजनी द ग्रेट...


द रोबो... डॉट...

गझनी, थ्री इडियट आणि दबंग सुपर ड्युपर हिट झाले. अमुक रेकॉर्ड, तमुक रेकॉर्ड झाले. हा विक्रम मोडला, तो विक्रम मोडला असल्या बातम्या कायमच वाचनात येतात. हिंदीमध्ये सध्या शाहरुख, आमीर आणि सलमान या तिघांच्या खानावळींना बॉलिवूडमध्सये ध्या विशेष चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे या मंडळींचे नवे चित्रपट आले की, अशा बातम्या काय झळकतात. त्यापैकी काही चित्रपटांचा आशय चांगला असतो, यात वाद नाही. पण विक्रम, गर्दी, उच्चांक, रेकॉर्डब्रेक हे शब्द या मंडळींसाठी नाहीतच. हे सर्व शब्द फक्त एका आणि एकाच माणसासाठी आहेत, तो म्हणजे द ग्रेट रजनीकांत, रजनी द बॉस... (अमिताभ आणि चिरंजीवी हे अपवाद ठरु शकतात, हा भाग अलहिदा)

रजनीचा १७० की २०० कोटी माहित नाही पण आतापर्यंतचा सर्वाधिक महागडा चित्रपट म्हणून प्रसिद्धी पावलेला बिग बजेट रोबो (इंदिरन) शनिवारी मुंबईत प्लाझाला जाऊन पाहिला. तुफान गर्दी आणि बरेचसे पिटातले प्रेक्षक असल्यामुळे टाळ्या, शिट्ट्या आणि आरडाओरडा ऐकत चित्रपट मनसोक्त एन्जॉय केला. रजनीकांतचा शिवाजी द बॉस हा चित्रपट पुण्यात लक्ष्मीनारायणमध्ये पाहिला होता. त्यावेळी देविदास देशपांडे (उर्फ सेल्वी रंजन, डी. अय्यर, पी. राम, ई. करुणाकरन किंवा तत्सम कोणत्याही तमिळ नावाने ओळखला जाऊ शकेल असा आमचा मराठी मित्र) बरोबर असल्यामुळे आम्ही तमिळमधला शिवाजी द बॉस पाहिला होता. पण यंदा तो नसल्यामुळं इंदिरन न पाहता हिंदीतला रोबोच पाहिला.

वेड लावणारे स्टंटस, हॉलिवूडच्या तोडीचे इफेक्टस, भन्नाट कथा, लक्षणीय वेग आणि २५ मिनिटांचा क्लयमॅक्स असं सगळं एकमेकाच्या हातात हात घालून आलेलं आहे. त्यावर आयसिंग म्हणजे रजनीकांतचा खतरनाक परफॉर्मन्स... तीन तास डोकं बाजूला ठेवायचं आणि फक्त पहायचं...



चिट्टी लय भारी...

डॉ. वशीकरण (रजनीकांत) हा दहा वर्षांपासून स्वतः सारखाच दिसणारा एक रोबो तयार करण्यात व्यस्त असतो. चित्रपट सुरु होताच त्याला वशीकरण आपल्या प्रोजेक्टमध्ये यशस्वी होतो आणि सुरुवातीच्या काही क्षणातच एकाच वेळी दोन रजनीकांत पडद्यावर दिसू लागतात. प्रचंड बुद्धीमत्ता असलेला हा रोबो घर काम करण्यापासून ते कराटेपर्यंत आणि नॅचरल डिलिव्हरी करण्यापासून ते नाच करण्यापर्यंत सर्व काही येत असतं. आपण जसं गावाला जाताना विविध प्रकारचे कपडे बॅगेत भरतो त्याप्रमाणे वेगवेगळ्या विद्या वशीकरणनं या रोबोमध्ये भरलेल्या असतात. चिट्टी... रोबोचं नाव. हा चिट्टी वॉटरप्रूफ आणि फायरप्रूफ असतं. चिट्टीला जगातल्या तीसएक भाषा येत असतात आणि बरंच काही काही त्याला येत असतं. (प्रत्यक्ष पहाच)

अनेक करामती करणा-या या चिट्टीला हिंदुस्थानी संरक्षण दलांमध्ये समाविष्ट करण्यासाठी वशीकरणचे प्रयत्न सुरु असतात. पण चिट्टी हा भावनाशून्य असून तो चांगल्या वाईटाची निवड करु शकत नाही, त्याचा गैरवापरही होऊ शकतं, असा दावा करत डॅनी (वशीकरणचा गुरु) चिट्टीशी कट्टी करतो. त्याला नाकारतो. दुसरीकडे डॅनी हा डॉ. वशीकरणवर मनातून जळत असतो. आपण तसा रोबो बनवू शकत नाही, ही सल कायम त्याच्या मनात असते. ते डोक्यात ठेवूनच तो कायम वशीकरणला टोचून बोलत असतो. डॅनीने झिडकारल्यानंतर वशीकरण चिट्टीमध्ये भावना ओतण्याचं काम करतो. त्याला पुस्तकं वाचायला देतो, त्यामध्ये कसल्या कसल्या सीडी, डिव्हीडी फिड करतो. (सगळंच भन्नाट)



चुकीची लाईन...

वशीकरणच्या या प्रयत्नांना चांगलंच यश येतं आणि चिट्टीमध्ये भावना निर्माण होतात. तो चिडतो, रागावतो, खूष होतो आणि प्रेमही करु लागतो. पण चिट्टीचा नेम चुकतो आणि तो वशीकरणच्या प्रेयसीवरच (ऐश्वर्या राय) लाईन मारायला लागतो. तेव्हापासून वशीकरण आणि चिट्टीचं फाटायला लागतं. ऐश्वर्या चिट्टीला अनेकदा समजावून सांगते पण तो ऐकत नाही. शिवाय वशीकरण आणि ऐश्वर्या यांची प्रायव्हसी चिट्टीमुळे धोक्यात येते. म्हणजे तसं वशीकरणला तरी वाटतं. वशीकरण, चिट्टी व ऐश्वर्या हा भासमान प्रेमाचा त्रिकोण मस्त धम्माल निर्माण करतो. एकदा तर चिट्टी ऐश्वर्याला थेट मागणीच घालतो. तेव्हा या लफडेबाजीला वैतागून वशीकरण चिट्टीला मोडून तोडून कचरा डेपोत नेऊन टाकतो. तिथून तो चेन्नईच्या फुरसुंगीत किंवा देवनारमध्ये जातो.

डॅनीला ही गोष्ट कळते. तो तिथं जाऊन चिट्टीला स्वतःच्या लॅबमध्ये नेतो. त्यामध्ये वाईट-साईट प्रवृत्ती भरतो. सीडी, डिव्हीडी, प्रोग्रॅम, चिप्स (खायचे नाही) अपलोड करतो. त्यामुळं चिट्टी आता विध्वंसक बनतो. काम डॅनीचं आणि बिल फाटतं डॉ. वशीकरणवर. चिट्टी बॉम्बस्फोट घडवितो, आगी लावतो, पेट्रोल-डिझेलचे टॅंकर पेटवून टाकतो आणि बरंच काही काही करतो. शेवटी तो स्वतः सारखे शेकडो नव्हे हजारो चिट्टी तयार करतो आणि मग चित्रपटातील स्पेशल इफेक्टसचं अस्तित्त्व जाणवायला लागतं. एकाचवेळी इतके रजनीकांत पाहून खरं तर चक्करच येते. या सा-या चिट्टींविरोधात वशीकरण एकटा लढतो. त्यांचा नायनाट करतो.

२५ मिनिटांचा क्लायमॅक्स

चित्रपटाचा हा क्लायमॅक्सचा संघर्ष तब्बल २५ मिनिटे रंगला आहे. सर्व चिट्टी एकत्र येऊन केलेली फॉर्मेशन्स आणि लष्कर, पोलिस, इतर सुरक्षा दलांचा उडविलेला फज्जा डोळे फिरविणारा. अखेर त्यांच्यापैकी एक चिट्टी मरतो आणि त्याचा रचनेचा काही मिनिटांमध्ये अभ्यास करुन वशीकरण सर्वांनाच वश करतो आणि मग ख-या चिट्टीतील दोष-वाईटपणा नष्ट करतो. पण हे सारं कसं घडतं, काय काय घडतं ते तुम्ही प्रत्यक्ष पडद्यावरच पहा.

चित्रपटामध्ये रजनीकांतची एकही फेमस स्टाईल नाही. उलट गॉगल घालण्याची नेहमीची स्टाईल त्याला जमत नाही आणि तो सर्वांप्रमाणेच साधेपणाने गॉगल घालतो, असं दृष्य दाखविण्यात आलं आहे. शिवाय डान्समध्येही रजनीचं फार कौशल्य नाही. तरीही चित्रपट भाव खाऊन जातो. हॉलिवूडच्या तोडीचा वाटतो. कारण चित्रपटामध्ये वापरण्यात आलेले स्पशेल इफेक्टस आणि तंत्रज्ञान. शिवाय प्रेक्षकांच्या मनावर जबरदस्त कब्जा मिळविणारी कथा, पटकथा आणि संवाद यामुळे तुम्ही रजनीकांतचे डाय हार्ट फॅन नसाल तरी तुम्हाला चित्रपट जरुर जरुर आवडणारंच. चिट्टी या रोबोचा थरार पाहून दोन अडीच तासात तुम्ही त्याचे फॅन बनला नाहीत तर नवल. म्हणून तर चित्रपटाच्या शेवटी जेव्हा चिट्टीला डिसमेंटल करतात (तोडतात) तेव्हा मनाला खूप वाईट वाटतं. म्हणजे मला तरी वाटलं.

मैं सोचने लगा था...

डिसमेंटल केला त्यानंतर एका संग्रहालयात ठेवण्यात येतं. २०३० मध्ये एका शाळेची स्टडी टूर तिथं येते. त्यावेळी एक विद्यार्थिनी मोडलेल्या तोडलेल्या चिट्टीकडे पाहून विचारते, हा इतका अपडेटेड आणि हुशार होता मग त्याला तोडण्यात का आलं. त्यावर चिट्टीनं दिलेलं उत्तर थेट मनाला भिडतं. चिट्टी म्हणतो मी विचार करायला लागलो होतो. अलिकडच्या हिंदी चित्रपटांत मी तरी इतका भारी आणि भिडणारा संवाद ऐकला नव्हता. मी काही खूप चित्रपट पाहत नाही. पण तरीही माझ्या मनाला हे एक वाक्य इतकं भिडलं की कोणती मुलगीही भिडली नसेल.



देव आहे...

एका कॉन्फरन्समध्ये चिट्टीला विचारतात. देव आहे का. त्यावर चिट्टी विचारतो, देव म्हणजे काय. प्रश्नकर्ता उत्तर देतो, निर्माण करणारा, तयार करणारा म्हणजे देव. मग चिट्टी वशीकरणकडे पाहून म्हणतो, तसं असेल तर देव आहे. वशीकरण यांनी मला निर्माण केलंय आणि ते माझे देव आहेत. रजनीकांतवर कॅमेरा आणि हा माझा देव असा डायलॉग हे कॉम्बिनेशन पुढचे दोन-पाच मिनिटं काहीच ऐकून देत नाही. नुसत्या टाळ्या, शिट्ट्या आणि कल्ला...

एकाच वेळी विनोदी, अतिरंजीत, हृदयस्पर्शी, भविष्यातील तंत्रज्ञानाचा विचार करुन तयार केलेला हा चित्रपट मी तरी अजून एकदा पाहणार आहे. तमिळमध्ये. तुम्ही एकदा तरी पहा. किमान हिंदीत तरी.

5 comments:

Devidas Deshpande said...

जबरदस्त. एन्दिरन रोबो रे.
पण विक्रम, गर्दी, उच्चांक, रेकॉर्डब्रेक हे शब्द या मंडळींसाठी नाहीतच. हे सर्व शब्द फक्त एका आणि एकाच माणसासाठी आहेत, तो म्हणजे द ग्रेट रजनीकांत, रजनी द बॉस
हे आपल्याला एकदम आवडलं. तमिळमध्ये पाहा हा चित्रपट. भारतीय रुपेरी पडद्यावरील अद्भूत कलाकृती.

Anonymous said...

मी पाहिला कालच रोबोट..एकदम जबरदस्त...ब्लॉगवर लिहलही आहे त्यबद्दल...

Anonymous said...

Chan...

Tushar Bodkhe

Anonymous said...

Sahi...

Harish Ranganathan

Abhay Jinsiwale. said...

Ashish Tuze Likhan Jabardast, Tuza Sarakha Mitra Asane He Amache Bhagya.