Monday, April 28, 2014

चप्पा चप्पा... भाजप्पा...


जन जन का संकल्प अटल... 

लखनऊ... संपूर्ण भारतामध्ये नवाबांचं लखनऊ हीच लखनऊची ओळख असली तरीही माझ्यासाठी लखनऊ म्हणजे भारताचे लाडके पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं लखनऊ... वाजपेयी  आणि लखनऊ यांचं अतूट नातं आहे. त्यामुळंच उत्तर प्रदेशच्या निवडणूक दौ-याची सुरुवात लखनऊपासूनच करण्याचं निश्चित केलं होतं. त्यानुसार सुरुवात झाली.

यंदा लखनऊमधून भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह हे निवडणूक लढवित आहेत. अमित शहा यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपविण्यात आल्यानंतर त्यांनी अनेक सुभेदारांची हलवाहलव करून पार्टीच्या समोर कोणीही मोठा नाही, हा संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्या हलवाहलवीमध्ये लखनऊमधून हलविण्यात आलेले एक नेते लालजी टंडन. त्यांच्याऐवजी राजनाथ यांना लखनऊमधून उतरविण्याचा निर्णय पार्टीने घेतला. लखनऊ हा भाजपाचा उत्तर प्रदेशातील सर्वाधिक मजबूत बालेकिल्ला आहे. १९९१ पासून वाजपेयी इथले खासदार होते. त्यानंतर एक टर्म टंडन हे लखनऊचे किल्लेदार होते. आता राजनाथ हे लखनऊतून उभे आहेत.



काँग्रेसच्या रिटा बहुगुणा-जोशी, समाजवादी पार्टीचे आलोक मिश्रा, बहुजन समाज पार्टीचे नकुल दुबे आणि आम आदमी पार्टीचे जावेद जाफरी हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. लखनऊमध्ये जवळपास साडेतीन लाख मते ही मुस्लिमांची आहेत. त्यापैकी जवळपास दोन लाख मते ही शिया मुस्लिमांची आहेत. त्यामुळे भाजपाचा बालेकिल्ला हस्तगत करायचा असेल तर एकगठ्ठा मुस्लिम मते आपल्या पारड्यात पाडायची हा सर्वाधिक सोप्पा उपाय. मात्र, यावेळी परिस्थिती रंजक आहे. जावेद जाफरी हे शिया पंथाचे असल्यामुळे शिया समाजाची बरीच मते त्यांच्या पारड्यात पडतील, असा जाणकारांचा कयास आहे. शिवाय मुस्लिमांचे मसिहा म्हणून ओळखले जाणारे मुलायमसिंह यादव आणि जामा मशिदींच्या इमामांकडे मतांचा जोगवा मागणा-या सोनिया गांधी यांची काँग्रेस देखील मुस्लिम मतांवर डोळा ठेवून आहेत. त्यामुळे मुस्लिम मतांची विभागणी होईल आणि भाजपचा विजय आणखी सुकर होेईल, अशी चर्चा लखनऊमध्ये आहे. 



रविवारचा मुहूर्त असल्यामुळे प्रचाराचा जोरदार धुरळा उडणार होता. भारतभर प्रचार करणा-या राजनाथ यांनी शेवटचे चार दिवस फक्त लखनऊसाठी राखून ठेवले होते. त्यापैकी रविवार हा अगदीच खास. रिटा बहुगुणा जोशी आणि जावेद जाफरी यांचेही रोड शो होते. मात्र, मुलायमसिंह यांच्या मोठ्या भावाचे निधन झाल्यामुळे समाजवादी पार्टीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. बसपाचाही रविवारनिमित्ताने विशेष कार्यक्रम नव्हता. 

त्यामुळे सक्काळी सक्काळी आम्ही पोहोचलो भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात. तिथं राजनाथ सिंह यांच्या रोड शो ची जोरदार तयारी सुरू होती. लखनऊ आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून सकाळपासूनच कार्यकर्ते येत होते. गेल्या दहा-बारा वर्षांपासून मरगळलेल्या भाजपाला पुन्हा एकदा संजीवनी मिळाल्याचं भाजपा कार्यालयात पोहोचल्यानंतर लगेचच जाणवलं. आपलं सरकार येणार म्हटल्यानंतर जी एक बॉडी लँग्वेज असते, ती भाजपच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये दिसत होती. सर्वत्र जोश आणि उत्साह संचारला होता. मळक्या  शर्टवर किंवा टी-शर्टवर मोदी यांचे चित्र असलेले पांढरे शुभ्र टी-शर्ट चढविणा-या गोरगरीब कार्यकर्त्यांपासून हातामध्ये दोन दोन आयफोन असलेल्या आणि कडक इस्त्रीच्या कपड्यांमध्ये वावरणा-या हायफंडू कार्यकर्त्यांपर्यंत सर्व स्तरातील कार्यकर्ते इथं पहायला मिळत होते. मुस्लिम समाजाचं प्रतिनिधीत्त्वही पहायला मिळत होतं. 



भाजपाच्या प्रथेप्रमाणे कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांसाठी चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. पुरी-भाजी आणि शिरा खाऊन मग एक ग्लास चहा प्यायल्यानंतर कार्यकर्ते अब की बार मोदी सरकार घोषणा देण्यासाठी तयार होत होते.  कुणी भाजपच्या भगव्या टोप्या कुठं मिळतात, याची शोधाशोध करीत होतं. तर कुणी भाजपचे झेंडे खांद्यावर घेऊन मिरवत होतं. मुख्यालयासमोरच थाटलेल्या प्रचार साहित्याच्या स्टॉलवरही खरेदीसाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडाली होती. एवढ्यात लालजी टंडन यांचं आगमन होतं. मग त्यांच्या पाया पडण्यासााठी कार्यकर्त्यांचा गराडा पडतो. त्यातूनच वाट काढत, कोणाला जवळ घेत, कोणाकडे किरकोळ कटाक्श टाकून लालजी टंडन कार्यालयात मार्गस्थ होतात. राजनाथसिंह दहा मिनिटांत येत आहेत, अशी घोषणा होते आणि मग कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण येतं. हर हर मोदी, घर घर मोदी.., चप्पा चप्पा, भाजप्पा..., लाल किलेपर कमल निशान, माँग रहा है हिंदुस्थान..., नरेंद्र मोदी कमल निशान, माँग रहा है हिंदुस्थान... अशा घोेषणा जोरजोरात दिल्या जात असतात. मधूनच एक उत्साही कार्यकर्ता देश का नेता कैसा हो राजनाथसिंह जैसा हो... अशी घोषणा देतो. त्याला तातडीनं बाजूला घेतलं जातं.




भाजपच्या कार्यालयात मोठ्या संख्येनं आलेल्या मुस्लिम कार्यकर्त्यांचे फोटो टिपण्यासाठी मग माध्यमांचे प्रतिनिधी आणि इतर कार्यकर्त्यांची झुंबड उडते. मोदींचा जयजयकार त्यांच्याकडूनही सुरू असतो. मुस्लिम कार्यकर्ते इतक्या संख्येनं आलेले पाहून मग माध्यमांचे प्रतिनिधीही त्यांच्या मुलाखती वगैरे घ्यायला सुरूवात करतात. एवढ्यात राजनाथसिंह आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं आगमन होतं. भाजपा का एक नाथ, राजनाथ राजनाथ... अशा घोषणा जोरजोरात दिल्या जातात. कार्यकर्त्यांच्या गराड्यातून मार्ग काढत राजनाथ मुख्यालयात प्रवेश करतात. भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये तेव्हापासून संचारलेला उत्साह सायंकाळी साडेसातपर्यंत तसाच असतो. 

बरोब्बर अकरा वाजता राजनाथ यांच्या रोड शो ला सुरुवात होते. लखनऊच्या एकूण सहा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघांमधून हा रोड शो जाणार असतो. मध्य, पूर्व आणि उत्तर लखनऊ मतदारसंघांमधून. साधारण चाळीस किलोमीटरचा रोड शो. मनोहर पर्रीकर, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह, विजय गोयल, नितीन गडकरी वगैरे मंडळी या रोड शो मध्ये विविध टप्प्यांमध्ये सहभागी होत असतात. प्रचाराच्या तापलेल्या वातावरणाशी उन्हाशी स्पर्धा होत असते. अर्थात, उन्हाची सरशी होते आणि साधारण अर्धा-एक तास उघड्या टेम्पोमधून रोड शो करणारे राजनाथ तासाभरानंतर इनोव्हामध्ये बसून रोड शो सुरू करतात. मुख्य चौकांमध्ये सभा आणि इतर ठिकाणी कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन, अभिवादन असे रोड शो चे स्वरूप असते. 



शंभर-सव्वाशेच्या संख्येने थांबलेले भाजपाचे कार्यकर्ते, राजनाथ यांच्यावर उधळण्यासाठी पोतं भरून फुलांची असलेली व्यवस्था, जोरदार होत असलेली घोषणाबाजी हे चित्र चौकाचौकांत पहायला मिळत असतं. चारशे-पाचशे कार्यकर्ते बाईक्स वरून, मग साऊथच्या चित्रपटांमध्ये शोभून दिसेल असा चारचाकी गाड्यांचा ताफा, त्यामध्ये एकात राजनाथ बसलेले असतात. मध्येच कुठं टेम्पोमध्ये महिला, स्थानिक नेते, काही उत्साही मुस्लिम कार्यकर्ते असतात. जागोजागी त्यांच्या उधळण्यात आलेल्या फुलांमुळं राजनाथ यांच्या गाडीवर फुलांचा आणि हारांचा ढीगच्या ढीग जमा झालेला असतो. कार्यकर्त्यांच्या स्वागतामुळं रोड शो ला साधारण दीड-दोन तासांचा उशीर होत असतो. तरीही उत्साही कार्यकर्त्यांच्या संख्येत अजिबात घट होत नाही. कुठं छोटे ढोल वाजवून राजनाथ यांचं स्वागत होत असतं. सुरुवातीच्या टप्प्यात सगळा भाग हा मध्यमवर्गीय आणि उच्चमध्यमवर्गीय स्वरुपाचा. बहुतांश मतदार हा भाजपचा पारंपरिक मतदार असलेला. 




नंतरच्या टप्प्यात रोड शो अमीनबाग, चौक, इमामबाडा, सीतापूर रोड, त्रिवेणीनगर वगैरे भागातून जातो. हा भाग मुस्लिम बहुल. झोपड्यांची संख्या प्रचंड. तुलनेनं इथं भाजपाचं स्वागत कमी होतं. तरीही काही झोपड्यांवर भाजपाचे झेंडे लागलेले असतात. पण समाजवादी पार्टीचे झेंडे आणि बसपाचे छोटे छोटे रथ इथं मोठ्या प्रमाणात दिसतात. खदरा भागात राजनाथ यांच्या रोड शो ची समाप्ती असते. तिथं त्यांची जाहीर कोपरा सभा असते. रमणसिंह आणि राजनाथ दोघेही काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर जोेरदार आसूड ओढतात. उत्तर प्रदेशमध्ये गुंडागर्दी आणि बेरोजागारी असल्याबद्दल अखिलेश सरकारला जाब विचारतात. 

राजनाथ यांचा जोर असतो हिंदू-मुस्लिम ऐक्यावर. रमणसिह, शिवराजसिंह यांना विचारा त्यांनी हिंदूृ-मुस्लिमांमध्ये कधी भेद केला का. जातीय तेढ निर्माण केली का. आम्हाला घाबरू नका, आम्हाला एकदा संधी द्या... अशा राजनाथ यांच्या भाषणाचा आशय असतो. काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने मुस्लिमांचा वापर केला. आम्ही मुस्लिमांचा विकास करू, असे आश्वासन देतात. शिवाय शेवटच्या टप्प्यात प्रचाराला आल्याबद्दल मतदारांची माफी मागतात. भाजपच्या कार्यकर्त्यांना घराघरापर्यंत पोहोचण्याचा आदेश देतात. आपले मत नसले तरी त्यांच्याशी संपर्क साधा आणि मतदानासाठी बाहेर काढा, असे सांगतात. राजनाथ यांच्या खदरा येथील सभेला स्थानिक मुस्लिम मंडळी शंभर सव्वाशेच्या संख्येनं उपस्थित असतात. वीस-पंचवीस मिनिटं बोलल्यानंतर राजनाथ निघून जातात आणि मग आम्ही पुन्हा भाजपच्या कार्यालयाच्या दिशेनं निघतो.



भाजपा कार्यालयात गाडी सोडून दिल्यानंतर मग रूमवर जाण्यासाठी ऑटो पकडतो. ऑटोवाल्याच्या काचेवर काँग्रेसच्या रिटा बहुगुणा-जोशी यांचा स्टीकर असतो. इथं काय काँग्रेसची हवा का, म्हटल्यानंतर तो ऑटोवाला म्हणतो. नही भैय्या यहा भी मोदी की हवा ही है. हम काँग्रेसवाले है इसलिए ये स्टीकर लगाया है. कोण जिंकणार, असं विचारल्यानंतर त्याचं स्पष्ट उत्तर असतं. भैय्या हम तो काँग्रेस जितेगी ऐसाही बोलेंगे. आखिर हम उम्मीदवार नही देखते. सिर्फ पंजा देखके ठोक देते है. हवा मोदी की है, लेकिन हम पंजे को ही व्होट देंगे, असं त्याचं ठाम मत असतं. 

दिवसभरात ऑटोवाले, ड्रायव्हर, चहावाले, एटीएम सिक्युरिटी गार्ड, रस्त्यावरचे पादचारी, भाजी-फळविक्रेते अशा अनेकांशी बोलल्यानंतर सर्वांच्या मुखी एकच नाव होतं मोदी मोदी आणि मोदी. इस बार तो मोदी की ही हवा है... असं त्यांचं म्हणणं होतं. काँग्रेस जितेगा असं म्हणणारा पहिलीच व्यक्ती मला दिवसभरात भेटली आणि ती म्हणजे तो ऑटोवाला. अर्थाात, तो एकटा. बाकी सर्व मोदींचे समर्थक. 

7 comments:

Unknown said...

वा...सुंदर वर्णन मित्रा...
येवू दे, अजून झकास माहिती येऊ दे...
वाट बघतो आहे मित्रा :) :)

sagar said...

इथे बसून तिथले चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. बाय द वे पुरी भाजीचा आणि शिऱ्याचा आस्वाद घेतलास का ? खाद्यसंस्कृतीवरही निवांतपणे लेख हवेत..सागर गोखले

prashant.anaspure said...

पहिला गेल्या गेल्या शिरा पुरी भाजीवर ताव मारला असणार त्याशिवाय का ईतका भन्नाट लेख झालाय...नेते...चवीनं खाता अन् चवीनं लिहिता राव।बोले तो एकदम झकास.....

DATTA JADHAV said...

छान असेच वाचायला मिळो...

rajeshmanerikar said...

Good start.....
Expecting much more interesting stories from UP.

Unknown said...

फिल्डवरचं वार्तांकन वाचायला जरा जास्तच मजा येते...चांदोरकरांचा विजय असो!

Digambar Darade said...

Khup chhan