Thursday, May 08, 2014

मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या

इंद्रेशजींच्या समवेत एक दिवस

राजकीय नेत्यांबरोबर एक दिवस... हा कार्यक्रम आपण अनेकदा पाहिला आहे. वार्तांकन अनेकदा वाचले आहे. वाराणतीस आल्यानंतर मी देखील एक दिवस एका नेत्याबरोबर हिंडलो. अर्थात, तो नेता, ती व्यक्ती राजकारणी नव्हती. ती व्यक्ती म्हणजे संघाचे ज्येष्ठ प्रचारक असलेले इंद्रेशकुमारजी. 



अनेक दशकांपासून प्रचारक असलेल्या इंद्रेशजी यांच्यावर सध्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाची जबाबदारी आहे. 2002 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या या मंचाचे मार्गदर्शक म्हणून इंद्रेशजी यांच्यावर जबाबदारी आहे. देशभर मंचाचे काम विस्तारले आहे. देशाच्या पंतप्रधानपदी योग्य व्यक्तीची निवड व्हावी आणि त्यात मुस्लिम समाजाचेही योगदान असावे, या हेतूने हा मंच निवडणुकीत कार्यरत आहे. उत्तर प्रदेशात विविध ठिकाणी दौरे आटोपल्यानंतर इंद्रेशजी आणि त्यांचे सहकारी सध्या वाराणसी येथे मुक्कामी आहेत. त्यामुळे एकदिवस त्यांच्यासोबत राहण्याची संधी मिळाली. 



सकाळी दोन-चार ठिकाणी जाऊन मग दुपारच्या सुमारास डॉ. राजीव श्रीवास्तव यांच्या सिगरी थाना भागातील विशाल भारत संस्थान या कार्यालयात पोहोचलो. श्रीवास्तव हा माणूस भलताच अवलिया. काशी हिंदू विश्वविद्यालयात इतिहासाचा प्राध्यापक. मात्र, ही त्याची ओळख अपुरी आणि अर्धवट आहे. श्रीवास्तव यांच्यावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा प्रभाव आहे. त्यांनी 1988-89 मध्ये विशाल भारत संस्थान ही संस्था सुरू केली.  मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये ज्यांचे कोणीही नाही, अशा लहान मुला-मुलींचा ते सांभाळ करतात. अनाथ, पोरके असे शब्द वापरलेले त्यांना आवडत नाहीत. ज्यांचा कोणी नाही, त्यांचा अल्ला आहे, अशी विचारधारा. आतापर्यंत त्यांनी जवळपास 465 मुला-मुलींचा सांभाळ करून मार्गस्थ केले आहे. सध्या त्यांच्याकडे दीडशे मुलं आहेत. त्या सर्वांच्या राहण्याची, शिक्षणाची, जेवणा-खाणाची जबाबदारी श्रीवास्तव हेच उचलतात. साधी साधी माणसं काय कमाल उंचीची काम करू शकतात, हे श्रीवास्तव यांच्याकडे पाहिल्यानंतर समजतं.



चार महिन्यांपूर्वी एक चार महिन्यांची मुलगी त्यांच्या घरासमोर कुणीतरी ठेवून गेलं. तिचाही सांभाळही व्यवस्थित सुरू आहे. संस्थेत दाखल झाल्यानंतर श्रीवास्तव तिला रितसर दत्तक घेतात. मुला-मुलीचं नाव, नंतर वडील म्हणून राजीव यांचं नाव आणि आडनाव भारतवंशी, अशी पद्धत. कार्यालयात गेल्यानंतर जय हिंद सर असं म्हणून आपलं स्वागत होतं. चिल्ड्रेन बँक आणि लहान मुलांची संसद वगैरे उपक्रमही संस्थेत राबविले जातात. 

श्रीवास्तव यांचे दुसरे संस्थात्मक अपत्य म्हणजे मुस्लिम महिला फौंडेशन. ही संस्था मुस्लिम महिलांच्या विशेषतः विणकर महिलांच्या समस्यांचे-अडीअडचणींचे निराकरण करते. त्यांना बँकेतून लवकर कर्ज उपलब्ध व्हावे, शिवणकामासाठी सिलाई मशीन स्वस्तात उपलब्ध करून देणे, आरोग्य शिबिरे आयोजित करणे, कायदेशीर मार्गदर्शन करणे वगैरे वगैरे. अर्चना भारतवंशी, नाजनीन अन्सारी, नजमा परवीन यांच्याकडे मुस्लिम महिला फौंडेशनची जबाबदारी आहे. दहा ते बारा हजार मुुस्लिम महिला त्यामार्फत जोडल्या गेल्या आहेत. गेल्याच वर्षी 23 जानेवारीला त्यांनी भारतीय अवाम पार्टीची स्थापना केली आहे. यात 90 टक्के महिला आरक्षण आहे. या पार्टीत सर्व महिलांना प्रवेश असला तरीही मुस्लिम महिलांची संख्या अधिक आहे. आतापर्यंत 35 हजार महिलांनी त्याचं सदस्यत्व घेतलं आहे. 

मुस्लिम महिला फौंडेशनमार्फत सध्या विणकर वस्त्यांमध्ये जनजागृतीसाठी आणि परिवर्तनाचा नारा देण्यासाठी महिला मेळावे घेतले जात आहेत. अशाच एका मेळाव्याला इंद्रेशकुमारजी उपस्थित राहणार होते. महिलांशी संवाद साधून त्यांना योग्य उमेदवाराची निवड करण्याचे आवाहन करण्याचे काम इंद्रेशजी उत्तर प्रदेशात सर्वत्र करीत आहेत. त्यामुळे  राजीव श्रीवास्तव यांच्या कार्यालयात गेल्यानंतर आम्ही इंद्रेशजी यांच्याकडे जाण्यासाठी निघणार होतो. तिथं आम्हाला जॉईन झाले, भारतीय जनता पार्टीचे राजेंद्र प्रताप गुप्ता. भाजपाचा जाहीरनामा लिहिणाऱ्यांच्या समितीत गुप्ता यांचा समावेश होता. 

मग आम्ही सर्व पोहोचलो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात पोहोचलो. तिथं इंद्रेशजी यांच्या सोबत अॅडव्होकेट नूर फातिमा, संस्कृत अध्ययनासाठी काशी येेथे आलेला एक विद्यार्थी स्वयंसेवक आणि पंजाबमधून वाराणसीत प्रचारासाठी आलेले स्वयंसेवक होते. इंद्रेशजी यांना कार्यकर्त्यांचे फोन येत होते. त्यांच्याशी ते संवाद साधून मार्गदर्शन करीत होते. पंधरा मिनिटं बातम्यांचा आढावा घेण्यात गेली. त्यानंतर आम्ही निघालो. नूर फातिमा या शिया पंथीय मुस्लिम असून शिवभक्त आहेत. त्यांनी कंधवा गेट परिसरात भव्य असे शिवमंदिर बांधले आहे. इंद्रेशजी यांचा उल्लेख त्या भाईसाहब असा करत असतात.

 


संघ कार्यालयातून बाहेर पडणार तेवढ्यात एक सुरक्षारक्षक आत येतो आणि वाटेतील गाडी बाजूला घ्यायला लावतो. तेवढ्यात एक आलिशान गाडी प्रवेशद्वारातून आत शिरते. त्यातून उत्तर प्रदेशात भाजपची हवा निर्माण करण्यात मोलाची कामगिरी बजाविणारे अमित शहा उतरतात. ते संघ कार्यालयात वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आलेले असतात. अत्यंत विनम्रतेने ते इंद्रेशजी यांना नमस्कार करतात. इंद्रेशजी देखील त्यांना मिठी मारतात. कार्यालयातील एका खोलीत पाच मिनिटे अमित शहा यांच्याशी चर्चा करून इंद्रेशजी बाहेर येतात. मग आम्ही निघतो सरैय्या हा मुस्लिमबहुल भागात.



तसं पहायला गेलं तर वस्ती एकदम बकाल. झोपड्या कम बैठ्या घरांची वस्ती. बकऱ्यांची बे बे, पटकन डोळ्याला दिसणारे दोन-तीन खाटिक, उघडी गटारं, गप्पा मारत बसलेले वयोवृद्ध मुस्लिम नागरिक... असं कुठल्याही मुस्लिम मोहल्ल्यात दिसणारं चित्र इथंही होतं. काँग्रेस, समाजवादी आणि बसपाचे नेते नरेंद्र मोदींच्या नावाने कंठशोष करतात ना, की मोदींनी मुस्लिमांवर अन्याय केला, दुर्लक्ष केले. लेकांनो, तुम्ही तरी कुठं मुस्लिमांचा विकास केला. पहा जरा त्या वस्त्यांकडे पहा. असो.



एका छोटेखानी कार्यालयातील खोलीमध्ये आम्ही शिरतो. तिथं आधीपासूनच सुमारे सत्तर ते ऐंशी मुस्लिम महिला इंद्रेशजींची वाट पाहत असतात. मग प्रथेप्रमाणे त्यांचं पुष्पहार वगैरे घालून स्वागत होतं. त्यांच्याबरोबरच्या इतरांचीही ओळख करून दिली जाते. अर्चना भारतवंशी आणि राजीव श्रीवास्तव यांनी प्रस्तावना करून दिल्यानंतर मग इंद्रेशजी हे बोलण्याठी उभे राहतात. सुरुवातीला ते गैरराजकीय विचार मांडतात. कुराण, मज्बे इस्लाम, कुठले कुठले शायर आणि सुफी संत यांचे दाखले देत अस्सल उर्दूतून ते संवाद साधतात. मुस्लिम महिलांनी मुलांना शिकविले पाहिजे. संस्कारित केले पाहिजे. एखादी व्यक्ती जन्मतः गरीब, कमजोर आणि मजबूर असू शकते. पण त्या परिस्थितीत मुलांना शिक्षित आणि सुसंस्कृत करण्याची जबाबदारी महिलांची आहे. तेव्हा मुलांना सुसंस्कृत आणि शिक्षित करा, असं आवाहन ते मुस्लिम महिलांना करतात. दारू आणि इतर व्यसनांच्या आहारी तुमची मुलं जाणार नाहीत, याची काळजी घ्या. त्यामुळंच वाट लागते इइ. 



मग ते राजकीय मुद्द्यावर येतात. हे पहा. तुम्हाला समाजवादी पार्टी, काँग्रेस आणि बहुजन समाज पार्टीनं अनेकदा अनेक आश्वासनं दिली. अनेकदा खोटंनाटं सांगून घाबरवलंही. पण तुम्हीच सांगा, परवा नरेंद्र मोदी यांनी अर्ज भरला तेव्हा तीन लाखांहून अधिक लोक जमले होते. तेव्हा त्यांनी मुस्लिमांवर हल्ला केला का, मुस्लिम महिलांकडे वाईट नजरेने पाहिले का, तुमच्या घरांवर दगडफेक झाली का, तुम्हाला संपविण्याचा प्रयत्न केला का... नाही ना. मग तुम्ही इतरांच्या भूलथापांना आणि भीतीला बळी पडू नका. बिजली, पानी आणि विकास ही त्रिसूत्री आहे. ती जो तुम्हाला देईल, असं वाटतं त्याला मतदान करा. सुरतचा विणकर आज चांगल्या स्थितीत आहे. तुम्हालाही जर तशीच आर्थिक परिस्थिती हवी असल्यास नीट विचार करून मतदान करा. नवरा सांगेल त्याला मतदान करू नका. उलट तुमच्या नवऱ्यालाच तुम्ही योग्य उमेदवाराला मतदान करण्याची गळ घाला. अत्यंत सूचक आणि मार्मिकपणे बोलतानाही ते नरेंद्र मोदींना मतदान करा, असं थेट आवाहन करीत नाही. 



साधारण पंचवीस-तीस मिनिटांच्या भाषणानंतर कार्यक्रम संपतो. मग उपस्थित महिलांशी ते नावानं संवाद साधतात. कसंय, मुलगा कुठंय, मुलगी काय करते इइ. टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी त्यांचा बाईट घेण्यासाठी आलेला असतो. त्याला ते सविस्तर मुलाखत देतात. ते थांबले आहेत, ही संधी साधून मग मी त्या महिलांशी संवाद साधतो. चूल आणि मूल यांच्यापुरतेच आयुष्य मर्यादित असल्याचे समजते. नवरा किंवा कुणीतरी घरात काम आणून देतो. टाके घालण्याचं, डिझाईननुसार विणण्याचं किंवा शिलाईचं. ते घरातूनच पूर्ण करून द्यायचं. कामाच्या तुलनेत पैसे खूप कमी मिळतात, असं सांगून त्या नेमके किती पैसे मिळतात ते सांगत नाहीत. या संस्थेत देखील यायला मिळतं कारण इथं सगळया महिला आहेत. अन्यथा तसं मोकळेपणानं वावरणं मुश्किल वगैरे. 



याच मुस्लिम महिला फौंडेशनच्या काही महिलांमार्फत नरेंद्र मोदी यांना राखी पाठविली जाते. त्यामुळं उत्सुकतेनं मी तिथं उपस्थित असलेल्यांपैकी काहींना विचारलं. वाराणसी येथून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी तुम्हाला नरेंद्र मोदी कोण आहेत, हे माहिती होतं का. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दहा ते बारापैकी आठ जणींनी नाही असं उत्तर दिलं. म्हणजे त्यांनी नरेंद्र मोदी, गोध्रा हत्याकांड, त्यानंतर उसळलेली दंगल, हिंदू-मुस्लिमांची झालेली कत्तल यापैकी काहीही माहिती नव्हतं. माझा विश्वास बसेना म्हणून परत परत विचारलं. खरं सांगा, त्यांचं नाव तरी ऐकलं होतं ना. वाराणसीमुळंच आम्हाला त्यांचं नाव कळलं, असं त्या वारंवार सांगत होत्या. आश्चर्याच्या धक्क्यातून सावरण्याच्या आतच आम्ही इंद्रेशजी यांच्यासोबत बाहेर पडतो.

दुसरीकडे जात असतानाच गाडीमध्ये श्रीवास्तव यांना फोन येतो. तुमच्यावर सरैय्या परिसरातील मुस्लिम पुरुष नाराजा झाले आहेत. इंद्रेशजी यांच्यासारखा माणूस फक्त महिलांशी संवाद साधतात आणि आमच्याशी नाही, ही गोष्ट त्यांना खटकलेली असते. मग दुसऱ्या दिवशी परिसरातील पुरुषांसमवेत इंद्रेशजी यांच्या गप्पागोष्टींचा कार्यक्रम निश्चित होतो. गाडीमध्ये इंद्रेशजी यांचा फोन खणाणतच असतो. कधी कुठल्या रिपोर्टरचा प्रतिक्रियेसाठी. तर कधी कार्यकर्त्यांचा माहिती देण्यासाठी किंवा दौरा विचारण्यासाठी. 



आता आम्ही चाललो होतो, सी एम अँग्लो बंगाली कॉलेजमध्ये. तिथं संस्कृती संसद २०१४ आयोजित करण्यात आलेली असते. काशीमधील पंडित, अभ्यासक, प्राध्यापक, संगीत विशारद, गायक वगैरे मंडळींचा जमावडा असतो. क्लासिकल गायक छन्नुलाल मिश्र, विवेक ओबेरॉय, भोजपुरी गायक मनोज तिवारी आणि असे अनेक जण तिथं असतात. काशी नगरीचे महत्त्व आणि ते अबाधित ठेवण्यासाठी योग्य व्यक्ती जिंकून येणे, कसे आवश्यक आहे, यावर तिथं चर्चा होते. दहा-पंधरा मिनिटं विचार मांडून ते तिथून निघतात. 



इंद्रेशजी यांना रात्रीच्या भोजनासाठी त्यांच्या मानलेल्या बहिणीकडे निमंत्रण असते. मी त्यांची रजा घेण्यासाठी विचारतो. मात्र, ते म्हणतात, तुम भी चलो. ओळख ना पाळख, शिवाय चार जण येणार म्हटल्यानंतर उगाच लोक वाढले तर अडचण नको, म्हणून जाणं टाळण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात इंद्रेशजी म्हणतात, अरे चार लोक आएेंगे, मतलब आठ-दस लोगोंका खाना तो बनेगा ना. ये उत्तर प्रदेश है आशिष... 

काशी हिंदू विश्वविद्यालयात प्राध्यापक असलेल्या त्यांच्या बहिणीकडे भलताच तामजाम असतो. वेलकम ड्रिंकपासून ते आइस्क्रिमपर्यंत. शिवाय पंधरा एक लोकं सहजपणे जेवतील, अशी व्यवस्था केलेली असते. तिथं इंद्रेशजी फिरताना आलेले अनुभव, नरेंद्र मोदी यांना भेटल्यानंतरच्या आठवणी, भृगू ऋषिंनी लिहून ठेवलेल्या भविष्याचा किस्सा अशी मग गप्पांची मैफल रंगते. रात्रीचे अकरा वाजल्याचे समजल्यानंतर मग निघण्याच्या गोष्टी होतात. 

आमचा दिवस संपला असला तरीही इंद्रेशजींचा दिवस अजूनही सुरूच असतो. लखऊहून आलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या कार्यकर्त्यांसमवेत पुढील दिशा ठरविण्यासाठी ते निघून जातात.

अत्यंत मृदूभाषी, कार्यकर्त्यांना जपणारा, प्रचंड अभ्यासू आणि अनुभवी असूनही समोरच्या व्यक्तीच्या भाषेत बोलणारे, राजकारणापासून अत्यंत निकट असूनही सीमारेषा न ओलांडणारे, सामाजिक क्षेत्रात वावरताना अनेक नवी नाती जोडून ती रक्ताच्या नात्यांइतकीच जपणारे आणि मुख्य म्हणजे संघटना आणि देशासाठी वैयक्तिक आयुष्य अर्पण करूनही गर्वाचा लवलेशही नसलेले संघ अधिकारी म्हणजे इंद्रेशकुमारजी. इंद्रेशजी हे झालं एक उदाहरण. संघाचे असे हजारो अधिकारी आणि कोट्यवधी स्वयंसेवक एका ध्येयासाठी आणि उद्दिष्टासाठी अहोरात्र झटत आहेत. परिवर्तन घडविण्यासाठी. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी. 

माध्यमांना ही ताकद कधीच दिसणार नाही. पण ही ताकद आहे आणि जेव्हा जेव्हा ती ताकद ठरविते तेव्हा परिवर्तन घडतेच. आणीबाणीनंतरचे परिवर्तन असो, अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार एक मताने पडल्यानंतरची निवडणूक असो किंवा सध्याची लोकसभा निवडणूक असो. जेव्हा जेव्हा संघ परिवार मैदानात उतरतो, तेव्हा चित्र पालटवून टाकतो...

6 comments:

Unknown said...

अतिउत्तम .... अशीशजी ....

Unknown said...

Very good. I have also stayed with Indreshji and i fully agree with you

sagar said...

अनेक नव्या गोष्टी कळत आहेत ब्लॉग वाचताना. कीप इट अप..सागर गोखले

psiddharam.blogspot.com said...

पाच वर्षांपूर्वी आदरणीय इंद्रेशजींना भेटण्याचा योग आला होता. देव माणूस. अत्यल्प वेळेत आपल्यावर आकाशाइतकं प्रेम करणारा माणूस. त्यांना एकदा भेटलेला माणूस कधीच विसरू शकत नाही. इश्वरी कृपेमुळेच अशा माणसांचे सानिध्य मिळते हे नक्की.

Arun said...

राष्ट्रसुधार, पुनःनिर्माणाची संतुलित, प्रखर दृष्टी असलेले मोदी पंतप्रधान म्हणून लाभोत, ही शुभकामना.

http://naadiastrologystudycircle.blogspot.in/ said...

"नरेंद्र मोदी यांना भेटल्यानंतरच्या आठवणी, भृगू ऋषिंनी लिहून ठेवलेल्या भविष्याचा किस्सा अशी मग गप्पांची मैफल रंगते. रात्रीचे अकरा वाजल्याचे समजल्यानंतर मग निघण्याच्या गोष्टी होतात. "
इंद्रेशजींचे भाषण ऐकायचा योग पुण्यात आला होता.वरील वाक्य मला भावले. कारण नमोंनी संबिता व नाडी ग्रंथांचे अवलोकन केले आहे एसे ऐकून आहे.
मला नाडी ग्रंथांच्या भविष्यातून नमोंच्या बद्दल महर्षींनी काय लिहिलेले आहे हे जाणून घ्यायला रस आहे.