Tuesday, May 06, 2014

रामलला 'हम आएंगे'

मंदिर भव्य बनाऐंगे...

उत्तर प्रदेशात यायचं. लखनऊ, रायबरेली, अमेठी, वाराणसी आणि इतर ठिकाणी जायचं. पण अयोध्येला जायचं नाही, हे माझ्या मनाला कधीच पटणार नव्हतं. त्यामुळं व्हाया सुलतानपूर अयोध्येला निघालो. रात्री अयोध्येला पोहोचायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरायचं. रामललाचं दर्शन घ्यायचं आणि मग पुढच्या प्रवासाला निघायचं असं डोक्यात होतं. सुलतानपूरहून बसमध्ये बसलो आणि माझ्या डोळ्यासमोर रामजन्मभूमी आंदोलनाचा सगळा पटच डोळ्यासमोरून जात होता. 



१९९० आणि १९९२ या दोन्ही वर्षी जेव्हा कारसेवा झाली, तेव्हा मी अनुक्रमे सहावी आणि आठवीमध्ये होतो. तेव्लहा हान असलो आणि आता बावीस-चोवीस वर्ष उलटली असली तरीही सगळं काही, अगदी कालपरवा घडल्यासारखं डोळ्यासमोर आहे. पहिल्या वेळेस चुलत भाऊ शैलेश आणि नंतर चुलत बहिण अर्चना कारसेवेत सहभागी झाले होते. शिवाय आमच्या परिसरातील अनिल बर्वे, विक्रम सुर्वे, प्रकाश जोशी, धनंजय वाघ, विनायक राहुरकर, धनंजय घाटेसह इतरही अनेक मित्र कारसेवेला गेले होते. त्यामुळे त्यांच्याकडूनही वेगवेगळ्या कहाण्या, किस्से आणि आठवणी ऐकल्या होत्या. 

अयोध्या, श्रीराम जन्मभूमी आंदोलन आणि तेव्हाचा सगळा काळ डोळ्यासमोरून तरळत होता. पुणे स्टेशनवर अयोध्येकडे जाणाऱ्या कारसेवकांची गर्दी आणि खचाखच भरलेल्या रेल्वे दिसत होत्या. आताइतका माध्यमांचा धुमाकूळ नसल्यामुळे कुठून तरी उडत बातम्या येत असत. खरं तर बातम्या नाहीच. अफवाच त्या. मनोहर जोशी शिवसैनिकासह विमानाने कारसेवेला जाणार, कारसेवक पॅराशूटनं अयोध्येतील विवादित जागेजवळ उतरले वगैरे वगैरे बातम्या कूठून कुठून कानावर यायच्या. कुणीकुणी त्या बातम्या ऐकून फटाकेही फोडायचं आणि पेढेही वाटायचं. पण बऱ्याचशा बातम्यांमध्ये तथ्य नसायचे हे नंतर समजायचं. 



चौकाचौकांतील संदेश फलकांवर चिटकविलेल्या सामना आणि नवाकाळच्या बातम्या नि अग्रलेख वाचायला प्रचंड गर्दी होत असे. लोक उत्सुकतेने ते वाचत आणि त्यावर चर्चा व्हायची. नातूबागेच्या मैदानावर प्रमोद महाजन यांनी मोठी सभा घेऊन संघ स्वयंसेवकांच्या तिसऱ्या प्रकाराची व्याख्या केली होती. म्हणजे पहिला नियमित स्वयंसेवक, दुसरा नैमित्तिक कार्यक्रमांना येणारा स्वयंसेवक आणि तिसरा म्हणजे काय राडा करायचा आहे का,  तर येतो, असं विचारणारा स्वयंसेवक. रामजन्मभूमी आंदोलनात तिसऱ्या गटातील स्वयंसेवकांचा पुढाकार आहे, असं सांगून मिळविलेल्या टाळ्या... ते सगळं डोळ्यासमोर तरळत होतं. 

सौगंध राम की खाते है, मंदिर वही बनाएेँगे..., तलवार निकली है म्यान से, मंदिर बनेगा शान से..., रामलला हम आएंगे, मंदिर वही बनाऐंगे, मंदिर भव्य बनाऐंगे... जो न हमारे राम का, वो न हमारे काम का... सगळ्या घोेषणा पुन्हा एकदा कानात घुमत होत्या. सहा डिसेंबर १९९२ रोजी बाबराच्या नावानं तयार झालेली वादग्रस्त वास्तू पाडल्यानंतर देशभरात झालेला जल्लोष, रस्त्यारस्त्यावर वाटण्यात आलेली साखर आणि पेढे, रामजन्मभूमी आंदोलनाचा बदल घेण्यासाठी धर्मांध मुस्लिमांनी मुंबईत पेटविलेली दंगल आणि बाळासाहेब ठाकरे नि शिवसेनेनं त्याला दिलेलं चोख प्रत्युत्तर, नंतर कायमचा धडा शिकेलेले धर्मांध मुसलमान, अयोध्या तो एक झाँकी है, काशी मथुरा अभी बाकी है... ही वादग्रस्त वास्तू पाडल्यानंतर घुमलेली घोषणा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर विनाकारण घातलेली बंदी आणि नंतर तोंडावर आपटलेलं सरकार, हिंदुत्ववाद्यांचे तेव्हा हिरो बनलेले कल्याणसिंह हे सारं काही सुलतानपूरहून अयोध्येला जाताना मला आठवत होतं. 



फैझाबादहून अयोध्येत पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर उठून शुचिर्भूत होऊन दर्शनासाठी निघालो. सगळीकडे मंगलमय वातावरण होतं. कुठं घरासमोर, दुकानांसमोर सडे घातले जात होते. रामचरितमानस, हनुमान चालिसा आणि राम-हनुमानाच्या भजनांचे स्वर कानावर येत होते. कुठे कचोरी (खस्ता), जिलेबी आणि सामोशाचे घाणे पडत होते. त्याचा गंध दरवळत होता. मंदिर मार्गावर जाताना दुकानदार मंडळी पेढे, प्रसाद, हार, फुलं घेण्यासाठी मागे लागत होती. तसे ते सगळीकडेच लागतात. त्या सर्वांना टाळून हनुमान गढीपर्यंत पोहोचलो.



चाळीस-पन्नास पायऱ्या चढून हनुमान गढीवर पोहोचलो. हनुमानाचे वंशज असलेल्या माकडांची वर्दळ मंदिरात सर्वत्र आहे. तुमच्या हातात प्रसाद असेल तर मग ते तुमच्या हातातून प्रसाद हिसकावतातच. तुम्ही दिला नाही, तर प्रसंगी चावतातही. हनुमान गढी इथं जाऊन 'राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की...' केलं. रामाचं दर्शन घेण्याआधी रामभक्त हनुमानाचं दर्शन घ्यावच लागणार. हनुमानाची दोन रुपं आहेत, एक वीर मारूती. जो पराक्रमी आहे, आक्रमक आहे. दुसरा आहे दास मारूती. महापराक्रमी परमप्रतापी वीर मारूती प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणाचा दास म्हणून दास मारूतीचं रुप आपल्याला फक्त रामाच्या मंदिरातच दिसतं. इतर ठिकाणी असलेला गदाधारी हनुमान रामांच्या चरणी हात जोडून असतो. 

हनुमान गढीनंतर, जनक भवन, कनक भवन, दशरथ गद्दी वगैरे पाहिलं. दशरथ गद्दी इथं सहा फुटी हनुमानाची मूर्ती ठेवण्यात आली आहे. दशरथ गद्दी इथं जाताना गाइडनं एक गल्ली दाखविलं. १९९० मध्ये झालेल्या कारसेवेच्या वेळी दोन कारसेवक इथंच हुतात्मा झाले होते, असं त्यानं एका गल्लीत शिरताना मला सांगितलं आणि अंगावर अक्षरशः काटा आला. कोलकात्याचे रामकुमार कोठारी आणि शरदकुमार कोठारी या बंधूंचं राममंदिरासाठीचं बलिदन कोण विसरू शकेल. परिंदा भी पर मा नही सकेगा... या मुसलमानांचे मसीहा मुलायमसिंह यादव यांचं म्हणणं खोटं करून दाखविणाऱ्या कोठारी बंधूंनी लाठी-गोली खाऐंगे, मंदिर वही बनाऐंगे... असं म्हणत राममंदिरासाठी प्राणांची बाजी लावली. ऐहिक सुखासाठी कशाचीच तमा न बाळगणाऱ्यांच्या या जगात कोठारी बंधूंनी एका ध्येयासाठी, विचारासाठी प्राणांचे बलिदान केले. गाइडनं अयोध्येची माहिती देताना बोलता बोलता सांगितलं, की अयोध्येमध्ये एकूण साडेसात हजार छोटी-मोठी मंदिरं आहेत. इतकी मंदिरं आहेत. राम, सीता, हनुमान, शंकर भगवान, माँ दुर्गा आणि अशा अनेक देवदेवतांची मंदिरं आहेत. माझ्यामते त्या साडेसात हजार मंदिरांमध्ये आणखी दोन मंदिर कम स्मारकं हवीत. एक म्हणजे रामकुमार कोठारी यांचं आणि दुसरं शरदकुमार कोेठारी यांचं.



रामललाचं दर्शन घेण्यापूर्वी रामाचा दास हनुमान याचं दर्शन घेतलं. तसंच रामासाठी प्राणापर्ण करणाऱ्या त्यांच्या दोन सर्वश्रेष्ठ भक्तांचंही दर्शन घडलं. तिथून मग राममंदिराच्या दिशेनं निघालो. संपूर्ण अयोध्येत आणि विशेषतः मंदिराच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून आत मंदिरासमोर जाईपर्यंत चारवेळा आपली काटोकोर तपासणी केली जाते. घड्याळ, मोबाईल, पेन ड्राईव्ह, सीम कार्ड, चिप वैगेर काहीही बरोबर नेऊ दिलं जात नाही. इतंकच सोडा कंगवा आणि टूथपिक सुद्धा त्यांनी काढून ठेवायला सांगितल्या. 



मंदिर मार्गावर प्रवेश केल्यानंतर सगळा मार्ग बंदिस्त आहे. तीनही बाजूंनी लोखंडी जाळीनं मार्ग बंदिस्त आहे. आपण फक्त चालत रहायचं. त्याचा सर्वाधिक फायदा म्हणजे परिसरातील माकडांपासून आपला बचाव होतो. अनेक वळणं वळणं पार करून एका चढावर पोहोचल्यानंतर मंदिर दिसू लागतं. मंदिरावर डौलानं फडकणारा भगवा झेंडा दिसू लागतो. चढ चढल्यानंतर साधारण वीस-पंचवीस पावलं चालल्यानंतर बरोब्बर मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर उभे राहतो. मंदिर आणि आपल्यामध्ये पन्नास पावलांचं अंतर असतं. इथूनच आपल्याला रामललाचं दर्शन घ्यावं लागतं. पण प्रकाशव्यवस्था उत्तम असल्यामुळं दर्शन खूप मस्त होतं. तंबूसारख्या आकारच्या मंदिरात रामलला विराजमान झाले आहेत. मोठ्या थाटात आणि दिमाखात विराजमान बसले आहेत. त्यांच्यासमोर नतमस्त झाल्यानंतर मग साधारण एक-दीड किलोमीटरची पायपीट करून पुन्हा लॉकर रूमपाशी पोहोचलो. 

मुळात कोणत्याही गावामध्ये गेल्यानंतर मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची फारशी उत्सुकता मला नसते. मात्र, अयोध्येचं राममंदिर त्याला अपवाद आहे. दलित समाजाच्या पुनरुत्थानात नाशिकच्या काळाराम मंदिराच्या आंदोलनाचं जे महत्त्व आहे, तेच हिंदू समाज संघटनाच्या इतिहासात राममंदिराच्या आंदोलनाचं महत्त्व आहे. त्यामुळं हे मंदिर इतर सर्व मंदिरापेक्षा वेगळं आहे. शिवाय काशी-मथुरेत मंदिराच्या बाजूला मशीद आहे. मंदिर पाडून मशीद बांधलेली नाही. इथं राममंदिर पाडून त्यावर मशीद बांधण्यात आली होती. मशीद कसली वादग्रस्त वास्तूच होती ती. ना तिथं मुस्लिम कधी नमाज पढले ना तिथं कधी धार्मिक प्रथापरंपरा जपल्या गेल्या. त्यामुळं अयोध्येचं आंदोलन हा एक धडा होता. शांतपणे शेजारी रहाल तर कदाचित आपण सुखाने नांदू शकू. पण जर आक्रमण करून आमच्या छाताडावर तुमची संस्कृती नि तुमच्या परंपरा लादण्याचा प्रयत्न केलात, तर बाबरी मशिदीसारखे उद्ध्वस्त व्हाल. रामजन्मभूमी आंदोलनाचा खरं तर हाच धडा सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. 



रामललाचं छान दर्शन झाल्यानंतर मग नाश्त्याकडे वळलो. आधी पोटोबा आणि मग विठोबा ही म्हण अयोध्येसाठी लागू नव्हती. पुरीभाजी, कचौरी (खस्ता) आणि चहा घेतल्यानंतर मग अयोध्येतील लोकांशी थोडं बोललो. त्यांना काय वाटतं, काय नाही, हे जाणून घेतलं. अयोध्येतून 'लल्लूसिंह को इस बार नाही जिताया, तो भगवान राम भी हमें माफ नही करेंगे...' अयोध्येतील एका चहावाल्याची बोलकी प्रतिक्रिया. 'भैय्या मोदीजी का पीएम बनना तो तय है. इसबार नही तो कभी नही...' आणखी एक बोलकी प्रतिक्रिया. चहावाले, पानवाले, पुरीभाजीचे ठेले लावणारे, रस्त्यारस्त्यावरून भगवी वस्त्र घालून हिंडणारे साधू-साध्वी सगळ्यांच्याच तोंडी मोदीनामाचा जप. मंदिर बनेगा क्या... मंदिर बनना चाहिए क्या... या प्रश्नांना थेट उत्तर. 'मंदिर तो बनेगा. मंदिर बनने से कौन रोक सकता है. सब तय्यारी हो चुकी है. पत्थर काम भी पुरा हो  रहा है. अब सिर्फ मंजुरी मिलना बाकी है. एक दिन में मंदिर का काम शुरू हो जाएगा...' 



अयोध्यावासियांची प्रभू रामचंद्रांवर जेवढी श्रद्धा आहे, तेवढीच मंदिर बनणार आणि मोदीच ते बनविणार यावरही आहे. शौचालय व्हायलाच पाहिजे. पण देवालयही पाहिजे. विकास पाहिजे पण हेदेखील व्हायलाच पाहिजे, पण मूळ मुद्दे आणि विचार यांना तिलांजली देऊन नाही, यावरही आक्षेप असण्याचे कारण नाही. शिवाय आता बाबरी मशीद नामक वादग्रस्त वास्तू त्या ठिकाणी नाही. तिथं पुन्हा बाबरी मशीद बांधण्याची ताकद कोणत्याही पक्षाच्या सरकारमध्ये नाही आणि मुख्य म्हणजे आता तिथं असलेलं रामललाचं मंदिर हटविण्याची हिंमत असलेला 'माई का लाल' जन्माला आलेला नाही आणि भविष्यात कधीही जन्माला यायची शक्यताही नाही.

भरपूर लोकांशी बोलल्यानंतर मग श्री अयोध्येतून निघालो. अयोध्यावासियांच्या शब्दात सांगायचे तर अयोध्याजी मधून निघालो. मनातल्या मनात जोरात घोषणा दिली, 'रामलला हम आएंगे, मंदिर भव्य बनाऐंगे.' यामधील 'हम आएंगे' या शब्दाचा अर्थ काय आहे, हे सूज्ञ वाचकांना सांगण्याची काहीच गरज नाही. 

तेव्हा अयोध्येतून लखनऊसाठी निघालो. लखनऊला जाऊन मग पुढं वाराणसीसाठी निघायचं होतं. नरेंद्र मोदींप्रमाणेच 'मुझे भी माँ गंगा बुला रही है...'

बोलो सियावर रामचंद्र की जय... पवनसूत हनुमान की जय.

15 comments:

Yogesh said...

‘आधी पोटोबा आणि मग विठोबा ही म्हण अयोध्येसाठी लागू नव्हती...’या एका वाक्यातच अयोध्येच्या राम मंदिराची महती सांगितलीये गुरुजी. मस्तच.

अमित चिविलकर said...

दादा.. खरं किती जवळून तु अयोध्या दाखवलीस.. अयोध्या न पाहताही आपल्याला कितीतरी जवळची वाटते ती रामललामुळेच! रामलला हम आएेंगे.. मंदिर वही बनाएेंगे!

Dnyanganga said...

सर जी., जय श्रीराम. जीव घुसमटतो आहे. कधी आपण राममंदिर बांधू ? आपण संविधानापुढे जाउ शकणार नाही. आणि कोणी हिंमतही करणार नाही. त्यामुळे कितीही शतक उलटली तरी कदाचित आपण जो आपल्याला न्याय देतो,त्याला आपण न्याय देउ शकणार नाही. आपण त्यांना न्याय देणारे तरी कोण.न्याय म्हणण्यापेक्षा त्यांनी दिलेल्या जन्माबद्दल कृतज्ञता म्हणूनही आपण श्रीरामाचे मंदिर बांधू शकणार नाही.आपण कृतज्ञताही व्यक्त करू शकत नाही. सर्व पक्षात श्रीरामभक्त आहेत. सर्वजण अयोध्येला जाण्याची इच्छा बाळगतात. परंतू ह्या मुद्दयावर मौन बाळगतात. हिंमत करत नाहीत, एकत्र येण्याचे धाडस दाखवत नाहीत. महत्वकांक्षा असली तर अवकाशात यान सोडून परत जमिनीवर आपण येवू शकतो, आलेलो आहोत. 'आधार' सारखे महत्वकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प की ज्यात प्रत्येक भारतीयाला केवढा मनस्ताप,केवढा खर्च केवढी गुंतागुंत सर्व असूनही 80 टक्क्यांपर्यंत राबवूनही शेवटी ठप्प. 121 करोड लोकांना सळो की पळो करून सोडणारी,सिलिंडरची कारण नसतांनाची संख्या कमी जास्त.का करतो आपण हे सर्व ? का छळतो लोकांना ? त्यापेक्षा जर भक्ती भावाने एकत्र येवून सर्वस्तरातील दिग्गजांना, तज्ज्ञांना एकत्र आणून, संविधानानुसारच जर श्रीराममंदिर बांधण्यात आले तर नक्कीच आपण कुठेतरी कृतज्ञतेचा सुखद अनुभव घेवू शकू. जय श्रीराम.!!

Mahendra Tiwari said...

फारच छान. ... धन्यवाद

Unknown said...

आशिष,
काशी मध्ये जी मशीद (मुख्य मंदिरा समोर) आहे ती देखील एक मंदीर पाडूनच बनवली आहे …. बिंदू - माधवाचे मंदीर

Vishwas Diggikar said...

वाचलं. छान!

Unknown said...

फारच छान

Unknown said...

इथे बसून आयोध्येच चित्र डोळ्यासमोर उभे राहिले... मस्त..

Ajinkya kulkarni said...

Good one crying for last 10 min

Bhagyesh Ranade. said...

darjaa chandorkarr.........

ashishchandorkar said...

Chann Sir... waiting for next destination.

Amita Shinde
.....

Aiiiii shapath, mastach punha ekada Ayodhela jaun aale. Angavarcha sahara ajun jat nahiy. vachun kay vataty te shabdat nahi sangta yet ahe . Mastach

Archana Chandorkar

ashishchandorkar said...

मास्तर मस्तच.....मस्त सुरू आहे लेखन...ऑल द बेस्ट खास वाराणसीसाठी..

जयदीप पाठकजी
....

बढिया...

मनोज मोहिते
...

ashishchandorkar said...

मस्त लिहिले आहे आशिषजी. डोळ्यासमोर चित्र उभे राहिले. तुमचे सगळेच ब्लॉग वाचतो. आवडतात.
मंदार दातार
....

एकदम सुंदर... अयोध्या दर्शन झाले.

विनोद वाघमारे

ashishchandorkar said...

Ashishji ekdam badiya ahe. .. sagla dolyasmor ubha rahila. .je amala phaila milala nahe. Dhanyavad

विजय गायकवाड
....

Changdeo Patil said...

Quality writing!!