Showing posts with label Ayodhya. Show all posts
Showing posts with label Ayodhya. Show all posts

Sunday, November 10, 2019

रामरायाचे मनापासून आभार मानेन...

 कोठारी बंधूंच्या बहिणीला भावना अनावर...


भविष्यात रामजन्मभूमीच्या आंदोलनाचा जेव्हा जेव्हा उल्लेख होईल, तेव्हा कोठारी बंधूंच्या बलिदानाचा कायमच आदराने आणि आठवणीने उल्लेख होईल... अयोध्येचे आंदोलन उभारण्यात महत्त्वाची भूमिका वठविणारे मोरोपंत पिंगळे, आंदोलनाची धग वाढविण्यासाठी देशभर रथयात्रा काढणारे भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, श्रीराम मंदिराच्या निर्मितीसाठी हयात खर्ची घालणारे विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोकजी सिंघलशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, साध्वी ऋतंभरा, उमा भारती, आचार्य धर्मेंद, विनय कटियार आणि चेहऱ्याविना कारसेवेत सहभागी होणाऱ्या लाखो कारसेवकांचा बहुतांश हिंदू समाज ऋणी असेल. यांच्याबरोबरच कदाचित पहिली आठवण येईल, ती राममंदिरासाठी बलिदान देणाऱ्या रामकुमार कोठारी आणि शरदकुमार कोठारी यांची... 

श्रीराम मंदिर निर्मितीसाठी १९९०मध्ये जेव्हा पहिल्यांदा कारसेवा झाली तेव्हा कोलकात्याचे रामकुमार कोठारी आणि शरदकुमार कोठारी हे अयोध्येमध्ये पोहोचले. परिंदा भी पर नही मार सकेगा… अशी घोषणा उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी केली होती. मात्र, कोठारी बंधूंनी ३० ऑक्टोबर रोजी बाबरी मशि‍दीवर चढून भगवा झेंडा फडकविला. त्यावेळी कोठारी बंधूंना ताब्यात घेण्यात आले आणि फैजाबाद येथे नेऊन सोडून देण्यात आले. दोन नोव्हेंबर रोजी ते पुन्हा बाबरी मशि‍दीच्या परिसरात आंदोलनासाठी पोहोचले. त्यावेळी मुलायमसिंह यांच्या आदेशानंतर पोलिसांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात एकूण अकरा कारसेवकांना प्राण गमवावे लागले. त्यामध्ये कोठारी बंधूंचा समावेश होता… एकाच घरातील हाताशी आलेली दोन पोरं मारली गेली...

धर्मासाठी प्राणांचे बलिदान करणाऱ्या कोठारी बंधूंच्या आई-वडिलांचे निधन झाले असून, त्यांची बहीण पौर्णिमा सध्या भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती आहे. कोलकात्यामध्ये भाजपचे काम करते आहे. अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर तिच्याशी बोलणं झालं... तिला दिवसभरात काही पत्रकारांचे फोन आले होते. बहुतांश फोन हे दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील पत्रकारांचे होते. माझ्याशी बोलताना पौर्णिमा अनेकदा भावनिक होत होत्या... त्यांचा स्वर दाटून येत होता.


कोठारी कुटुंबासाठी आजचा दिवस आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा आहे. खरंतर सुवर्णदिन आहे. ज्या दिवसाची आम्ही सर्व आतुरतेनं वाट पाहत होतो, तोच हा दिवस. दुर्दैवाने आजचा दिवस पहायला माझे भाऊ नाहीत आणि आई-वडीलही नाहीत. आज जर आई-बाबा असते तर आपल्या मुलांच्या बलिदानाचे सार्थक झाले, अशी त्यांची भावना नक्कीच झाली असती. दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्यानंतर ते खरं तर प्रभू श्रीरामांचे मंदिर कधी उभारले जाणार, यासाठीच आयुष्य जगत होते. माझ्या दोन्ही भावांना आणि त्यांच्या पश्चात अनेक वर्षांचा पुत्रवियोग सहन करणाऱ्या माझ्या आई-वडिलांच्या मृतात्म्यांना आज खऱ्या अर्थाने शांती मिळाली असेल… 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा प्रचंड आनंददायक आणि बलिदानाचे सार्थक झाल्याची भावना निर्माण करणारा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा माझ्या भावांवर पगडा होता. संघाचे स्वयंसेवकच होते ते. त्यामुळेच हिंदुत्वाच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी राममंदिराच्या निर्मितीसाठी कारसेवेत सहभागी होण्याचे निश्चित केले आणि ते अयोध्येत पोहोचले. पुढे काय झाले, ते सर्वांना माहिती आहेच. हाताशी आलेली मुले गमाविल्यामुळे माझे आई-वडील त्यावेळी पार कोलमडून गेले होते. पण धर्मकार्यासाठी मुलांनी केलेले बलिदान वाया जाणार नाही, हा विश्वास आई-वडिलांमध्ये होता. तोच त्यांच्या जगण्याचा अधार होता. त्यामुळे त्यांनी भावांच्या मृत्यूचे दुःख कधीच व्यक्त केले नाही. जवळपास तीन दशके आम्ही जे सहन केले, त्याचे फळ आज खऱ्या अर्थाने मिळाले आहे,’ हे सांगताना पौर्णिमा यांचा कंठ दाटून आला होता.

माझ्या भावांनी अयोध्येमध्ये बलिदान दिल्यानंतर आमच्या कुटुंबाचे आणि अयोध्येचे एका वेगळ्या प्रकारचे ऋणानुंबध निर्माण झाले. त्यानंतर जेव्हा जेव्हा कारसेवा झाली, तेव्हा माझे आई-वडील प्रत्येक कारसेवेत सहभागी होत असत. आम्ही दरवर्षी किमान तीन ते चारवेळा तरी अयोध्येला जायचोच. एकही वर्ष आमची अयोध्यावारी चुकली नाही. पुढच्या वेळी येऊ तेव्हा राममंदिराचा तिढा सुटलेला असू दे आणि श्रीराममंदिराची निर्मिती सुरू झालेली असू दे, हेच आमचे मागणे असायचे. आज माझे आई-वडील नाहीत. पण मी जेव्हा अयोध्येला जाईन, तेव्हा आमची प्रार्थना ऐकल्याबद्दल रामरायाचे आभार नक्की मानेन, असं त्या आवर्जून सांगतात.



भावांच्या बलिदानानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी विचाराच्या संघटनांनी आम्हाला भरभरून प्रेम दिले. कधीच कशाची कमी पडली नाही. आईला दोन्ही पुत्र गमवावे लागले असले, तरीही देशभरातून अनेक पुत्र आईला मिळाले. अनेक जण भावांच्या रुपाने माझ्या पाठिशी ठाम उभे राहिले. आमच्या कठीण प्रसंगांमध्ये कायम मदतीला धावून आले. निधनापूर्वी आई जेव्हा हॉस्पिटलमध्ये होती, तेव्हा रोज पन्नास-साठ जण आईची सेवा-सुश्रूषा करण्यासाठी असायचे. आम्हाला कधीच कशाची कमी पडली नाही. एखाद्या कुटुंबाला देशभरातून किती भरभरून प्रेम मिळावं, याचा अनुभव आम्ही कायम घेतला... पौर्णिमा सांगत होत्या...

दोन्ही भावांचं झालेलं बलिदान आणि राममंदिराबाबत काहीच तोडगा दृष्टीपथात नव्हता. तेव्हा कधी निराशा नाही आली का, असा माझा प्रश्न होता. मात्र, मला काय किंवा माझ्या आई-वडिलांना मी कधीच हताश झालेलं, निराश झालेलं पाहिलं नाही. आपण सर्वकाही गमाविलं असलं, तरीही आपल्या मुलांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, याची खात्री त्यांना पदोपदी होती. त्यामुळंच ते कधीही खचलेले मी पाहिले नाहीत, असंही पौर्णिमा आवर्जून सांगतात...

पाच-दहा मिनिटे सुरू असलेला संवाद संपल्यानंतर खऱ्या अर्थाने मनापासून समाधान वाटले... माझ्याप्रमाणेच शेकडो नागरिकांनी त्यांच्याशी संवाद साधून कोठारी बंधूंच्या बलिदानाबद्दल आदर व्यक्त केला होता... माझे बंधू आणि आई-वडिलांबद्दल देशभरातील नागरिकांमध्ये असलेला आदरभाव पाहून मलाही खूप भरून येते आहे, अशीच भावना पौर्णिमा यांच्याकडून व्यक्त होत होती.

अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर उभे राहीलच. आता तर सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर मोहोर उमटविली आहे. राममंदिर उभारल्यानंतर त्याच परिसरात कोठारी बंधूंसह सर्वच्या सर्व अकरा जणांचे एक स्मारक उभारायला हवे. श्रद्धा, भक्ती आणि समर्पण भाव यांचे प्रतीक म्हणून...

Sunday, November 25, 2018

'शिव'धनुष्य उचलले आणि जोखीमही...

पुढील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा रामाच्या नावाने राजकारण तापायला प्रारंभ झाला आहे. यंदा शिवसेनेने वातावरण तापविण्यात पुढाकार घेतला असून, सरसंघचालक मोहन भागवत यांनीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंदिर निर्मितीसाठी अध्यादेश आणण्याची सूचना केली आहे. शिवसेनेने हे पाऊल का उचलले असावे आणि त्याचे फायदे-तोटे काय याचा हा मागोवा…  



सहा डिसेंबर १९९२ ते २५ नोव्हेंबर २०१८… माझ्या शिवसैनिकांनी जर बाबरी मशीद पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे… ते हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार… गेल्या २६ वर्षांत राममंदिराची निर्मिती झाली नसली, तरीही पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले आहे. अशोक सिंघल यांनीही राममंदिर न पाहताच जगाचा निरोप घेतला आहे. डॉ. प्रवीण तोगडिया यांनीही विश्व हिंदू परिषदेचा निरोप घेतला आहे. आता २०१९मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राममंदिराचा मुद्दा तापविण्यास प्रारंभ झाला आहे. मंदिराचा मुद्दा आता ऐरणीवर आणण्यात येत असला, तरीही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपासून हा मुद्दा उद्धव यांच्या डोक्यात घोळत असावा. कारण मंदिर वही बनाएंगे, पर तारीख नही बताएंगे… ही घोषणा उद्धव यांनी त्याचवेळी जाहीर सभांमधून दिली होती.  

शिवसेनेने या मुद्द्याला हात घालून एक प्रकारे जोखीम पत्करली आहे, असेच म्हणावे लागेल. कारण या मुद्द्यामुळे फायदा होण्याची शक्यता जितकी आहे, तितकाच शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता देखील आहे. आगामी लोकसभा निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढता येईल. कामगिरीच्या आधारे मते मागून निवडणूक जिंकता येण्याची शक्यता कमी दिसते आहे. असली तरीही तसे करण्यात धोका आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदूंच्या भावनांना हात घालतील आणि राममंदिरासंदर्भात अध्यादेश आणतील, अशी अटकळ शिवसेनेने बांधली असावी. तसे झाल्यास भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कोणाच्याही मदतीशिवाय पूर्ण बहुमतापर्यंत निश्चितपणे पोहोचेल, असा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कयास असावा. त्यामुळेच निवडणुकीच्या निमित्ताने राममंदिराचा मुद्दा निघालाच तर सर्वाधिक आधी आम्ही या मुद्द्याची आठवण भाजपला आणि पंतप्रधान मोदी यांना करून दिली होती. आमच्यामुळेच राममंदिराचा प्रश्न मार्गी लागण्यास प्रारंभ झाला आहे, असे दाखवून देत राजकीय फायदा उठविण्याचे शिवसेनेचे मनसुबे दिसतात. त्यामुळेच भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील हिंदुत्ववाद्यांचे आयकॉन असलेले नरेंद्र मोदी या संदर्भात फारसे बोलायला तयार नसले तरीही शिवसेनेने वातावरण तापवायला सुरुवात केली आहे. 


राममंदिराचा मुद्दा उचलण्यामागचा आणखी एक हेतू म्हणजे मराठीचा मुद्दा मुंबई, ठाणे आणि कोकण या पलिकडे लोकांना आकर्षित करणारा नाही. शिवेसना वाढली ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर. १९८५च्या महाड अधिवेशनानंतर शिवसेनेने राज्यभर हातपाय पसरायला प्रारंभ केला. हिंदुत्वाच्या आधारेच शिवसेनेने कधीकाळी मराठवाड्यावर अधिराज्य गाजविले. खान हवा की बाण हवा असे आवाहन करून मते पदरात पाडून घेतली. बाबरी मशीद पाडल्यानंतर शिवसेनेने घेतलेली आक्रमक आणि निडर भूमिका अनेकांच्या पसंतीस पडली होती. तेव्हापासून शिवसेना म्हणजे हिंदुत्ववादी ही ओळख अधिक पक्की आणि दृढ झाली होती. शहरी भागातील मध्यमवर्गीय मतदारांना आकृष्ट करण्यासाठी कट्टर हिंदुत्वाचा हाच मुद्दा शिवसेनेला फायद्याचा ठरला. भाजपचा हक्काचा मतदार असलेल्या अनेक शहरी मतदारसंघांमध्ये शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच भगवा फडकाविला. भविष्यात जर राममंदिराचा मुद्दा तापला आणि भाजपबरोबर युती होऊ शकली नाही, तर हिंदुत्ववादी विचारांचे मतदार मतदान करताना शिवसेनेचाही विचार करतील, अशा हेतूनेही उद्धव ठाकरे यांनी अयोध्यावारीचे नियोजन केले असावे, असे शिवसेनेच्या अभ्यासकांचे म्हणणे आहे. भाजप हिंदुत्वाला विसरला असला, तरीही आम्ही विसरलेलो नाही, हे या निमित्ताने दाखवून द्यावे आणि शिवसेनेचा हिंदुत्वाचा खुंटा आणखी बळकट करावा, अशी उद्धव यांची खेळी आहे.

एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे गेल्या चार वर्षांमध्ये शिवेसना आणि भाजप यांचे नाते विळा-भोपळ्याचे राहिलेले आहे. राज्य सरकारमध्ये राहून शिवसेनेने चार वर्षे विरोधी पक्षाची भूमिका निभावली आहे. शक्य असेल तिथे आणि शक्य त्यावेळी शिवसेनेने भाजप तसेच सरकारच्या धोरणांना तसेच निर्णयांना विरोध करण्याचे काम शिवसेनेने केले. विरोधी पक्षांना बेदखल करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये असलेले ते एकप्रकारचे अंडरस्टँडिंगहोते, असा दावा आजही अनेक जण करतात. त्यात कितपत तथ्य हे त्या दोघांनाच ठाऊक. चार वर्षांतील प्रतिमा पुसून टाकण्यासाठी आणि स्वतःच्या पक्षाचे नव्याने रिब्रँडिंग करण्यासाठी देखील शिवसेनेने राममंदिराचा मुद्दा आक्रमकपणे लावून धरला आहे, असे काही जणांचे म्हणणे आहे. 

शिवसैनिकांसाठी एक कार्यक्रम म्हणून देखील रामजन्मभूमीच्या आंदोलनाकडे पाहता येऊ शकते. सरकारमध्ये चार वर्षे राहून काही प्रमाणात सुस्तावलेल्या शिवसैनिकाला या निमित्ताने जागृत करता येईल. वातावरण निर्मितीसाठी आणि अधिकाधिक कार्यकर्त्यांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी एक उपक्रम म्हणूनही हा मुद्दा शिवसेनेला निश्चितच फायद्याचा ठरेल.


राममंदिराचा मुद्दा उचलण्याचा शिवसेनेला फायदा होईल का? झालाच तर किती होईल? कसा होईल? अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. अनेकांना या बाबत प्रश्न पडत आहेत. मंदिराच्या मुद्द्यामुळे शिवसेनेला जसा फायदा होऊ शकतो, तसेच या मुद्द्याला हवा दिल्यामुळे काही प्रमाणात नुकसानही होऊ शकते, हे समजून घेतले पाहिजे. शिवसेनेच्या ग्रामीण भागातील अनेक आमदार, खासदार आणि नेत्यांचे असे म्हणणे आहे, की सध्या राज्यात सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकरी होरपळून निघणार आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत दुष्काळाचे चित्र अधिक गंभीर बनेल. त्यामुळे अशा परिस्थिती दुष्काळाच्या मदतकार्यावर लक्ष केंद्रित करतानाच राज्य सरकारच्या विरोधात शिवसेनेने रान पेटविण्याची गरज आहे. राममंदिराच्या भावनिक मुद्द्याच्या मागे न लागता ग्रामीण महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले, तर निवडणुकीत त्याचा अधिक फायदा होईल. राममंदिराच्या मुद्द्याला अधिक हवा दिली गेली आणि दुष्काळाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष झाले तर कदाचित शिवसेनेला फटका बसू शकतो, असे ग्रामीण भागातील नेत्यांचे म्हणणे आहे.

२०१९च्या निवडणुकीत २००० साली जन्मलेली व्यक्ती मतदान करण्यास पात्र ठरणार आहे. त्या पिढीने रामजन्मभूमीचा लढा किंवा वातावरण अनुभवलेले नाही. ती पिढी अशा घटनांबद्दल ऐकून असेलही. पण इंटरनेटच्या जमान्यात वावरणाऱ्या त्या तरुण-तरुणींना अशा भावनिक मुद्द्यांमध्ये कितपत रस असेल, हा चर्चेचा विषय आहे. कदाचित विकास, प्रकल्प आणि देशाचे बदलते चित्र या गोष्टीच त्यांना अधिक आकृष्ट करू शकतील. त्यामुळेच मोदी यांनी २०१४ची निवडणूक फक्त विकास या शब्दाभोवती फिरविली. त्यामुळे अशा पद्धतीने भावनिक मुद्द्याला हात घालण्यामुळे शिवसेनेला अपेक्षित फायदा होण्याची शक्यता कमीच वाटते आहे. त्यातही शिवसेना हे आंदोलन किती तापविते त्यावरही अनेक गोष्टी अवलंबून आहे. मुंबईत उठून अयोध्येला जायचे आणि वातावरण निर्माण करायचे, हे तितकेसे सोपे नाही. 

शिवसेनेचे बहुसंख्य आमदार हे मुंबई, ठाणे आणि कोकण पट्ट्यातील आहेत. मुंबई आणि कोकणातील मुस्लिम हा शिवसेनेला मतदान करतो, असा इतिहास आहे. यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत बेहरामपाडा आणि जोगेश्वरी या मुस्लिमबहुल भागातून शिवसेनेचे मुस्लिम नगरसेवक निवडून आले आहेत. राममंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा परतल्याने हा मुस्लिम मतदार शिवसेनेच्या पाठिखी किती ठामपणे उभा राहील, ही शंका आहे. दुसरीकडे भाजपच्या कारभाराला आणि नरेंद्र मोदी यांच्या धोरणांना वैतागलेल्या अनेक मतदारांनी पर्याय म्हणून शिवसेनेच्या पारड्यात मते टाकली होती. मग त्यामध्ये समाजवादीही आले आणि काही प्रमाणात डावेही आले. मुंबई महापालिका निवडणुकीत ते दिसून आले होते. शिवसेनेने राममंदिराचा मुद्दा उचलून धरला तर हे सर्व मतदार पक्षापासून दूर जाण्याची शक्यता अधिक आहे. त्याचा फटका मुंबई, ठाणे आणि कोकणात बसला तर शिवसेनेचे हक्काचे संख्याबळ घटण्याची भीती अधिक आहे. अर्थात, हिंदुत्वाचा मुद्दा अधिक प्रखरपणे लावून धरला तर मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांची मते पुन्हा एकदा शिवसेनेकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात, त्याबाबत खात्री मात्र, व्यक्त करता येणार नाही.


१९९२चे राममंदिर आंदोलन भाजप, विश्व हिंदू परिषद आणि संघपरिवारासह सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी उभारले होते. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अचूक टायमिंग दाखवत तापल्या तव्यावर पोळी भाजून घेतली होती. आता शिवसेनेने तवा तापविण्याला प्रारंभ केला आहे. तवा सेनेने तापविला तरीही पोळी भाजपलाच भाजता येणार आहे. कारण सत्तेची सारी सूत्रे भाजपकडे आहेत. पोळी भाजायची की नाही, याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत आणि अमित शहा घेतील.  भाजपने अध्यादेश आणला आणि राममंदिर निर्मितीचा मार्ग मोकळा केला, तर संघ परिवार निर्णयाचे पुरेपूर श्रेय घेईल. 

देशभरातील माध्यमे नि सोशल मीडिया या माध्यमातून श्रेय घेण्यासाठी पद्धतशीर मोहीम आखण्यात येईल. अशा परिस्थितीत शिवसेनेला त्याचे श्रेय घेण्यासाठी आणखी धडपड करावी लागेल किंवा मोहीम उघडावी लागेल. भाजपच्या पद्धतशीर प्रचार यंत्रणेला पुरून उरण्याइतकी ताकद शिवेसनेमध्ये आहे, असे सध्या तरी वाटत नाही. तवा तापविण्याचे काम आम्ही केले, इतकेच शिवसेना म्हणू शकेल. पोळी मात्र, भाजपचीच भाजली जाणार आहे.

अशा परिस्थितीत राममंदिराचा मुद्दा उचलून शिवसेनेने मोठी जोखीम पत्करली आहे. अर्थात, उद्धव यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करून मोठी जोखीमच पत्करली होती. तेव्हा उद्धव आणि शिवसेना यांचा सुपडा साफ होईल, अशी अटकळ अनेक जण बांधून होते. मात्र, तेव्हा जोखीम पत्करल्यामुळे शिवसेनेचा फायदाच झाला. आजही संघटना म्हणून त्यांना कदाचित फायदा होईलही. पण राजकीय पक्ष म्हणून त्यांच्या पारड्यात नेमके काय पडणार हे आताच सांगणे कठीण आहे. कदाचित फार काही पडण्याची शक्यता फार कमी आहे, असे आता तरी वाटते. बाकी रामनामाचा महिमा मोठा आहे. रामनाम लिहिल्यानंतर निर्जीव दगडही तरले, असे म्हणतात. कदाचित त्याच नावावर आपणही तरून जाऊ, असे शिवसेना नेत्यांना वाटत असेल तर त्यात चूक काहीच नाही. त्याच आशेवर उद्धव यांनी अयोध्यावारीची मोहीम आखली असेल.