Thursday, May 12, 2016

अशा बहिष्काराचे ‘आन्सर’ काय?


धर्मांध मुस्लिमांच्या चुकीचा फटका ‘अन्सार’ला

मी शुभम नाही, अन्सार शेख आहे, हे मी आता सर्वांना सांगू शकतो…’ केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (यूपीएससी) उत्तीर्ण झालेल्या अन्सारचं हे वक्तव्य खूपच अस्वस्थ करणारं आहे. पुण्यामध्ये राहण्यासाठी जागा मिळावी किंवा मेसमध्ये जेवण मिळावं, यासाठी त्याला स्वतःची ओळख लपावावी लागली. त्याला शुभम हे हिंदूधर्मीय मुलाचं खोटं नाव घ्यावं लागलं आणि त्यानंतरच त्याला रहायला जागा मिळाली. ही घटना खूपच अस्वस्थ करणारी आहे...

पुणेकर कधीपासून असे वागायला लागले, पुण्याच्या संस्कृतीला हे शोभणारे नाही, पुणेकर इतके कोत्या मनाचे असतील असं वाटलं नव्हतं वगैरे वगैरे… माध्यमे आणि सोशल माध्यमांवरून अशा प्रकारच्या टीका टिपण्ण्या सुरू झाल्या. अनेकांच्या मनातही असे प्रश्न निर्माण झाले असतील. कदाचित पुणेकरांच्या या असहिष्णुपणाबद्दल पुरस्कार वापसीची मोहीमही सुरू होईल. देशभरात त्याचा निषेध केला जाईल. आमच्या शहरात असे घडले नसते, तमक्या शहरात असे घडणार नाही, पुरोगामी महाराष्ट्र वगैरे तुणतुणंही वाजवलं जाईल. इ.इ.

मात्र, प्रत्येक नाण्याला दुसरी बाजूही असते आणि त्याबद्दल माध्यमे कधीच बोलणार नाहीत. लेखही छापणार नाहीत आणि त्याबद्दल चर्चाही करणार नाहीत. अन्सार शेख याला मुस्लिम म्हणून घर नाकारणं चुकीचंच आहे. त्याचं समर्थन करताच येणार नाही. मात्र, असा निर्णय घेण्यापर्यंत लोक का आले, याचा विचार आपण कधी करणार आहोत की नाही? हे समाजातील वास्तव आहे, समाजमन आहे, ते आपण कधी जाणून घेणार आहोत की नाही? 


मुळात हल्ली लोकांना दुसऱ्याची काही पडलेली नाहीये. आपण बरं आणि आपलं कुटुंब बरं अशी लोकांची मनस्थिती आहे. हे चांगलं की वाईट हा भाग वेगळा. पण परिस्थिती अशीच आहे. त्यात जवळचे मित्र आणि नातेवाईक सोडले तर इतरांबद्दल फारसं कोणाला सोयरसुतक नाही. घरची नि ऑफिसची टेन्शन्स, ताणले गेलेले संबंध, अस्थिरतेचं वातावरण, उद्याची चिंता, परफॉर्मन्ससाठी चाललेली धडपड आणि आयुष्यातील वाढलेला तणाव यांच्यामुळे लोकं शक्य तेवढं सोपं नि सरळ आयुष्य जगण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कोणालाही त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स, अडचणी किंवा ताणतणाव नको आहेत. घर भाड्यानं देताना करार करा, पोलिसांना माहिती द्या, भाडेकरूने काही भानगडी केल्या, तर पोलिस चौकशीला सामोरे जायचे वगैरे कटकटी सामान्य लोकांना नको आहेत. मुलाचं नाव अन्सार शेख. त्यातून तो जालना म्हणजे मराठवाड्यातून आलेला. त्यामुळं साहजिकच कोणीही नसत्या लफड्यात पडायला तयार होणार नाही, हे उघड आहे. आणि आता कितीही कोणीही म्हटलं, की आम्ही दिलं असतं वगैरे वगैरे, तरी अशा लोकांची संख्या आजच्या घडीला खूपच कमी आहे. (‘पुरोगामित्व असावे, पण शेजारच्या घरात’ अशी वृत्ती असलेले अनेक ढोंगी आज समाजात आहेत.)

घर भाड्याने देणे किंवा विकत देणे, ही तसं पहायला गेलं तर कोणाला द्यायचं किंवा कोणाला द्यायचं नाही, ही वैयक्तिक बाब आहे. त्यासाठी कोणताही कायदा नाही. कदाचित भविष्यात करताही येणार नाही. असा कायदा नसल्यामुळेच मांसाहारींना घर विकणार नाही किंवा फक्त जैन आणि मारवाडी यांनाच भाड्याने मिळेल, अशा सोसायट्या आढळतात. आपली मानसिकताच अशी आहे, की शक्यतो आपण जात आणि धर्म पाहून घरं भाड्यानं देतो किंवा विकत देतो. ओळखीतून आलेली व्यक्ती किंवा कुटुंब असेल, तर त्याला प्रथम प्राधान्य. घर ही वैयक्तिक प्रॉपर्टी असते आणि त्यामध्ये कोणी रहावे किंवा कशा प्रकारच्या व्यक्तीने रहावे, हे ठरविणे सर्वस्वी त्या मालकाचा अधिकार आहे. आणि व्यक्तीपरत्वे त्याच्या अपेक्षा आणि अटी बदलत जातात. (केरळ आणि काश्मीरमध्ये कदाचित वेगळी परिस्थिती अनुभवायला मिळेलही.)


आता बाहेरच्या राज्यातून किंवा जिल्ह्यातून पुण्यात शिकण्यासाठी आलेल्या एखाद्या दलित, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन किंवा मागासवर्गीय अथवा मांसाहारी व्यक्तीला घर नाकारले, असते तर त्याबद्दल फारशी चर्चा झाली नसती. आता होतेय तेवढी तर झालीच नसती. मात्र, अन्सार शेखला घर नाकारले, तो ‘यूपीएससी’मध्ये उत्तीर्ण झाला आणि त्याने उघडपणे ही गोष्ट सांगतली, त्यामुळेच ही चर्चा सुरू झाली आहे. मूळ मुद्दा असा, की मुस्लिम असल्यानेच त्याला घर नाकारले. अशा घटना पूर्वीही घडल्या असतील आणि यापुढेही घडतील. पण ही पुढे आली इतकेच. (अन्सार ‘यूपीएससी’ झाला नसता, तर त्याला तेवढी व्हॅल्यूही दिली नसती माध्यमांनी. किंवा ‘यूपीएससी’ करीत असताना त्याने हा मुद्दा काढला असता, तर किती प्रसिद्धी मिळाली असती, हा भाग अलहिदा.) लोक एक वेळ घर रिकामं ठेवतील, पण मुस्लिम व्यक्ती किंवा कुटुंबाला भाड्याने देणार नाहीत, इतका टोकाचा विचार करणारे लोक आहेत. आणि बहुसंख्येने आहेत. मात्र, ही परिस्थिती का निर्माण झाली, याचा विचार आपण करणार आहोत की नाही?

समाजातील बहुतांश लोकांमध्ये मुस्लिम समाजाबद्दल पुरेसा खुलेपणा नाही, ही गोष्ट मान्य केलीच पाहिजे. त्यासाठी सर्वसामान्य मुस्लिम समाज जबाबदार नसला, तरीही सध्या जगभरात ज्या घटना घडत आहेत, त्यामुळे इस्लामची प्रतिमा चांगलीच काळवंडली आहे. धर्माच्या नावाने ‘जिहाद’ पुकारणारे त्याला जबाबदार आहेत. सीरिया आणि इराकमध्ये धर्मयुद्ध पुकारून सामान्य नागरिकांची कत्तल करणाऱ्यांनी त्याला हातभार लावला आहे. अमेरिकेने इराक आणि अफगाणिस्तानवर हल्ला केला म्हणून, मुंबईत मोर्चे काढून ‘इस्लाम खतरे में…’ची बांग देणारे अशी प्रतिमा बनविण्याला हातभार लावत आहेत. आसाममध्ये बांग्लादेशी घुसखोर आणि स्थानिक नागरिक यांच्यातील संघर्षाला धर्मयुद्धाचे लेबल लावून आझाद मैदानावर नंगानाच घालणारे तसेच हुतात्मा स्मारकाची तोडफोड करणारे धर्मांध मुस्लिमांची प्रतिमा बिघडविण्यासाठी जबाबदार आहेत. 


देशद्रोही याकूब मेमनला फासावर लटकविल्याबद्दल मातम पाळणारे मुस्लिमांना इतर समाजापासून दूर घेऊन जात आहेत. अफझल गुरूच्या फाशीबद्दल शोक पाळणारे आणि त्याचं श्राद्ध घालणारे मुस्लिम आणि मुस्लिमेतरांमधील दरी वाढवित आहेत. मराठवाड्यात ‘आयटीआय’चं शिक्षण घेऊन भटकळ बंधूंच्या नादी लागून भारतात रक्तामांसाचा चिखल करण्यासाठी धडपडणारे ‘आदील, अफझल आणि अकबर’ ही मुस्लिम धर्माची बदनामी करत आहेत. रशिया, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि जवळपास आख्ख्या युरोपमध्ये दहशतीचा नंगानाच घालणारे दहशतवाद्यांची पिलावळ जागतिक पातळीवर मुस्लिमांची नाचक्की करीत आहे. जगभरात लोकांच्या प्रतिक्रिया वाचल्यानंतर मुस्लिमांबद्दल लोकांच्या मनात किती राग आहे, हे नक्की समजू शकेल.

पुण्यात घर भाड्याने न मिळण्याला तुझे अन्सार शेख हे नाव कारणीभूत आहेच. पण खरं कारण ते नाहीये. तर मुस्लिम समाजातील काही दळभद्र्यांनी धर्माची जी वाईट प्रतिमा बनविली आहे, ती खऱ्या अर्थानं कारणीभूत आहे. सर्व मुस्लिम दहशतवादी नाहीत, हे अगदी खरं आहे. त्यामुळे प्रत्येक मुस्लिम व्यक्तीकडे ‘त्या’ नजरेनं पाहणं चुकीचंच आहे. असं असलं तरीही बहुतांश दहशतवादी मुस्लिम आहेत, या गोष्टीकडेही दुर्लक्ष करता येत नाही. मुस्लिम धर्म दहशतवाद शिकवत नाही, हे मान्य. मात्र, तरीही रोज देशभरातील तरुण ‘आयएस’कडे आकृष्ट होत असल्याच्या बातम्या झळकतात. हे प्रमाण अगदी अत्यल्प असलं, तरीही संशयाच्या चष्म्यातून पाहण्यासाठी ते पुरेसं असतं. आता अशा चष्म्यातून पाहिलं नाही पाहिजे, वगैरे बोलबच्चन देणारे वास्तवाच्या आसपासही नाहीत. त्यांनी समाजात अधिक वावरण्याची गरज आहे.


आणि हे फक्त मुस्लिमांबद्दल आहे, असं नाही. पूर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत. गांधीजींची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रात ब्राह्मणांची घरं जाळण्यात आली, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर देशभरात शिखांचे शिरकाण झाले. मुंबईत तर तेव्हा एका पक्षाने आक्षेपार्ह पोस्टर्स लावली होती. माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी त्याचा उल्लेख संसदेमध्ये भाषणादरम्यान केला होता. ‘शीख ड्रायव्हर असलेल्या टॅक्सीचा फोटो त्या पोस्टर वर होता. आणि प्रश्न विचारला होता, की या ड्रायव्हरवर तुम्ही विश्वास ठेवून टॅक्सीत बसाल का?’ दुर्दैवाने तेव्हा माध्यमे इतकी सक्षम नव्हती, म्हणून त्याची फार चर्चा झाली नाही. थोडक्यात काय, तर ‘सुक्याबरोबर ओलेही जळते’ ही म्हण सर्वज्ञात आहे. वेळोवेळी कोणाला तरी त्याचा फटका बसत आलाय. सध्या मुस्लिम समाजाला बसतो आहे, इतकंच.

पण आशा सोडण्याचे कारण नाही. कारण अन्सार शेख सारखे तरुण हेच या या जटील प्रश्नाचे ‘आन्सर’ आहेत. ‘यूपीएससी’ उत्तीर्ण होऊन काही तरी करण्याची जिद्द तो बाळगून आहेत. चांगलं आहे मुस्लिम समाजातील तरुणांनी अन्सारसारख्यांचा आदर्श घेण्याची गरज आहे. अब्दुल हमीद, एपीजे अब्दुल कलाम वगैरे नावे आहेतच. पण अन्सारसारख्या व्यक्ती तुमच्या आमच्या आजूबाजूला घडत आहेत. हा बदल खूप चांगला आहे. ‘यूपीएससी’च्या मुलाखतीदरम्यान अन्सारने एका प्रश्नाला दिलेलं उत्तर फेसबुकवर वाचण्यात आलं. ते खरं की खोटं माहिती नाही. पण उत्तर मस्त आहे. ‘तू शिया आहेस की सु्न्नी मुस्लिम आहेस?’ या मुलाखतकर्त्यांच्या प्रश्नावर अन्सार म्हणाला, ‘मी भारतीय मुस्लिम आहे.’ 

उत्तर छान आहे. आणि आशादायक आहे. असा विचार करणाऱ्या मुस्लिमांची संख्या वाढली तरच दहशतवाद, जिहाद आणि इतर मार्गांकडे वळणाऱ्या तरुणांच्या संख्येवर मर्यादा येईल किंवा ते समाजात एकटे पडतील. आणि तसे झाले तरच भविष्यातील अन्सार शेखना पुण्यात काय कोणत्याच शहरात खऱ्या नावावर घर मिळण्यात अडचणी येणार नाहीत. तोपर्यंत वाईट असले, तरीही आहे ते वास्तव स्वीकारले पाहिजे. तूर्त इतकेच.

7 comments:

Makarand Desai said...

अन्सार शेखचे यश अप्रतिम आणि निर्भेळ आहे, त्याबद्दल त्याचे अभिनंदन...
मात्र मला पुण्यात नांव बदलून रहावे लागले (म्हणजे हिंदू नांव - शुभम धारण करून) असे तो सांगत आहे, आणि नेहमीप्रमाणे माध्यमे व सेक्युलर लोक आपल्या आवडत्या धर्माची कड घेत आहेत... मात्र मुद्दा असा की जे त्याच्या बाबतीत झालं ते दुर्दैवी आहे. पण यात चूक हिंदू समाजाची आहे का ? जेव्हा पुण्यात-मराठवाड्यातसुद्धा आयसीसचे आकर्षण पसरत आहे, त्याचबरोबर त्याच्या धर्मातील कट्टरपंथीय वर्गाचा प्रचंड प्रभाव बघता, त्याला नावामुळे संशयित म्हणून पाहिले जाणे साहजिकच आहे... स्वतःच्या धर्मातील वैगुण्याचं आणि त्यात शिरलेल्या राक्षसी प्रवृत्तीचा जाहीर (आणि संघ-भाजपचे नाव न घेता !!) निषेध करायचं धाडस आणि प्रामाणिकपणा जोपर्यंत या धर्मातील तरुण दाखवत नाहीत, तोपर्यंत अनेक अन्सार या दुर्दैवाचा सामना करतच राहतील. मात्र जे झालं त्याला हिंदू जबाबदार आहेत हे म्हणणारे पाखंडी आहेत....!

Satyajit Chitale said...

अगदी खरंय, जितके 'अफजल' बनलेत त्याच्या पाचपट अन्सार उभे राहिल्याशिवाय हे जनमत बदलणार नाही .बुंद से गयी....ही म्हण बदलायची जबाबदारी त्यांचीच असली तरी समंजसपणा दाखवण्याची जबाबदारी आपली आहे हेही विसरता कामा नये.

Unknown said...

नेहमीप्रमाणेच समर्पक ब्लॉग. व्यक्त केलेला आशावाद चांगलाच आहे.पण अशी मुस्लिम मुलंच इस्लाम धर्माची आशा आहेत ह्यात शंका नाही.

Unknown said...

नेहमीप्रमाणेच समर्पक ब्लॉग. व्यक्त केलेला आशावाद चांगलाच आहे.पण अशी मुस्लिम मुलंच इस्लाम धर्माची आशा आहेत ह्यात शंका नाही.

sagar said...

या घटनेच्या आणि विधानाच्या सगळ्या बाजूंचा विचार करुन नेहमीप्रमाणे रोखठोक लिहिले आहेस. अन्सारचे अभिनंदनच!..
अपवादाने नियम सिद्ध होतो म्हणतात. आपली आयडेंटीटी न लपवता देखील शहरात आणि समाजात सन्मानाने वावरलेले अनेक अन्सारही असतीलच की. त्यांनीही तसे सांगावे.

devendra said...

एखाद्या हिंदूच्या घरात 'अन्सार' जन्माला येत नाही, या किसी मुसलमान के बच्चे का नामकरण 'शुभम' नही होता तोपर्यंत या महाराष्ट्रात, हिंदुस्थानात नावावरूनच माणसाचा जात-धर्म ओळखला जाईल आणि 'कुणी घर देता का घर?' इसे प्रकार होत राहतील.

Ravindra Dashputre said...

Apratim lekh.
2 prashna
1. Ansaar la jaga deil asa ek hi muslim jaga malak punyat nahi ka ho? Is pune so saffron?
2. Sadhi rahayala jaga milavi mhanoon khote naav sanganara manoos 30 varshe mahatwachya padanvar pramanik pane nokari karel ka?