Sunday, November 10, 2019

रामरायाचे मनापासून आभार मानेन...

 कोठारी बंधूंच्या बहिणीला भावना अनावर...


भविष्यात रामजन्मभूमीच्या आंदोलनाचा जेव्हा जेव्हा उल्लेख होईल, तेव्हा कोठारी बंधूंच्या बलिदानाचा कायमच आदराने आणि आठवणीने उल्लेख होईल... अयोध्येचे आंदोलन उभारण्यात महत्त्वाची भूमिका वठविणारे मोरोपंत पिंगळे, आंदोलनाची धग वाढविण्यासाठी देशभर रथयात्रा काढणारे भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, श्रीराम मंदिराच्या निर्मितीसाठी हयात खर्ची घालणारे विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोकजी सिंघलशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, साध्वी ऋतंभरा, उमा भारती, आचार्य धर्मेंद, विनय कटियार आणि चेहऱ्याविना कारसेवेत सहभागी होणाऱ्या लाखो कारसेवकांचा बहुतांश हिंदू समाज ऋणी असेल. यांच्याबरोबरच कदाचित पहिली आठवण येईल, ती राममंदिरासाठी बलिदान देणाऱ्या रामकुमार कोठारी आणि शरदकुमार कोठारी यांची... 

श्रीराम मंदिर निर्मितीसाठी १९९०मध्ये जेव्हा पहिल्यांदा कारसेवा झाली तेव्हा कोलकात्याचे रामकुमार कोठारी आणि शरदकुमार कोठारी हे अयोध्येमध्ये पोहोचले. परिंदा भी पर नही मार सकेगा… अशी घोषणा उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी केली होती. मात्र, कोठारी बंधूंनी ३० ऑक्टोबर रोजी बाबरी मशि‍दीवर चढून भगवा झेंडा फडकविला. त्यावेळी कोठारी बंधूंना ताब्यात घेण्यात आले आणि फैजाबाद येथे नेऊन सोडून देण्यात आले. दोन नोव्हेंबर रोजी ते पुन्हा बाबरी मशि‍दीच्या परिसरात आंदोलनासाठी पोहोचले. त्यावेळी मुलायमसिंह यांच्या आदेशानंतर पोलिसांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात एकूण अकरा कारसेवकांना प्राण गमवावे लागले. त्यामध्ये कोठारी बंधूंचा समावेश होता… एकाच घरातील हाताशी आलेली दोन पोरं मारली गेली...

धर्मासाठी प्राणांचे बलिदान करणाऱ्या कोठारी बंधूंच्या आई-वडिलांचे निधन झाले असून, त्यांची बहीण पौर्णिमा सध्या भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती आहे. कोलकात्यामध्ये भाजपचे काम करते आहे. अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर तिच्याशी बोलणं झालं... तिला दिवसभरात काही पत्रकारांचे फोन आले होते. बहुतांश फोन हे दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील पत्रकारांचे होते. माझ्याशी बोलताना पौर्णिमा अनेकदा भावनिक होत होत्या... त्यांचा स्वर दाटून येत होता.


कोठारी कुटुंबासाठी आजचा दिवस आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा आहे. खरंतर सुवर्णदिन आहे. ज्या दिवसाची आम्ही सर्व आतुरतेनं वाट पाहत होतो, तोच हा दिवस. दुर्दैवाने आजचा दिवस पहायला माझे भाऊ नाहीत आणि आई-वडीलही नाहीत. आज जर आई-बाबा असते तर आपल्या मुलांच्या बलिदानाचे सार्थक झाले, अशी त्यांची भावना नक्कीच झाली असती. दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्यानंतर ते खरं तर प्रभू श्रीरामांचे मंदिर कधी उभारले जाणार, यासाठीच आयुष्य जगत होते. माझ्या दोन्ही भावांना आणि त्यांच्या पश्चात अनेक वर्षांचा पुत्रवियोग सहन करणाऱ्या माझ्या आई-वडिलांच्या मृतात्म्यांना आज खऱ्या अर्थाने शांती मिळाली असेल… 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा प्रचंड आनंददायक आणि बलिदानाचे सार्थक झाल्याची भावना निर्माण करणारा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा माझ्या भावांवर पगडा होता. संघाचे स्वयंसेवकच होते ते. त्यामुळेच हिंदुत्वाच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी राममंदिराच्या निर्मितीसाठी कारसेवेत सहभागी होण्याचे निश्चित केले आणि ते अयोध्येत पोहोचले. पुढे काय झाले, ते सर्वांना माहिती आहेच. हाताशी आलेली मुले गमाविल्यामुळे माझे आई-वडील त्यावेळी पार कोलमडून गेले होते. पण धर्मकार्यासाठी मुलांनी केलेले बलिदान वाया जाणार नाही, हा विश्वास आई-वडिलांमध्ये होता. तोच त्यांच्या जगण्याचा अधार होता. त्यामुळे त्यांनी भावांच्या मृत्यूचे दुःख कधीच व्यक्त केले नाही. जवळपास तीन दशके आम्ही जे सहन केले, त्याचे फळ आज खऱ्या अर्थाने मिळाले आहे,’ हे सांगताना पौर्णिमा यांचा कंठ दाटून आला होता.

माझ्या भावांनी अयोध्येमध्ये बलिदान दिल्यानंतर आमच्या कुटुंबाचे आणि अयोध्येचे एका वेगळ्या प्रकारचे ऋणानुंबध निर्माण झाले. त्यानंतर जेव्हा जेव्हा कारसेवा झाली, तेव्हा माझे आई-वडील प्रत्येक कारसेवेत सहभागी होत असत. आम्ही दरवर्षी किमान तीन ते चारवेळा तरी अयोध्येला जायचोच. एकही वर्ष आमची अयोध्यावारी चुकली नाही. पुढच्या वेळी येऊ तेव्हा राममंदिराचा तिढा सुटलेला असू दे आणि श्रीराममंदिराची निर्मिती सुरू झालेली असू दे, हेच आमचे मागणे असायचे. आज माझे आई-वडील नाहीत. पण मी जेव्हा अयोध्येला जाईन, तेव्हा आमची प्रार्थना ऐकल्याबद्दल रामरायाचे आभार नक्की मानेन, असं त्या आवर्जून सांगतात.



भावांच्या बलिदानानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी विचाराच्या संघटनांनी आम्हाला भरभरून प्रेम दिले. कधीच कशाची कमी पडली नाही. आईला दोन्ही पुत्र गमवावे लागले असले, तरीही देशभरातून अनेक पुत्र आईला मिळाले. अनेक जण भावांच्या रुपाने माझ्या पाठिशी ठाम उभे राहिले. आमच्या कठीण प्रसंगांमध्ये कायम मदतीला धावून आले. निधनापूर्वी आई जेव्हा हॉस्पिटलमध्ये होती, तेव्हा रोज पन्नास-साठ जण आईची सेवा-सुश्रूषा करण्यासाठी असायचे. आम्हाला कधीच कशाची कमी पडली नाही. एखाद्या कुटुंबाला देशभरातून किती भरभरून प्रेम मिळावं, याचा अनुभव आम्ही कायम घेतला... पौर्णिमा सांगत होत्या...

दोन्ही भावांचं झालेलं बलिदान आणि राममंदिराबाबत काहीच तोडगा दृष्टीपथात नव्हता. तेव्हा कधी निराशा नाही आली का, असा माझा प्रश्न होता. मात्र, मला काय किंवा माझ्या आई-वडिलांना मी कधीच हताश झालेलं, निराश झालेलं पाहिलं नाही. आपण सर्वकाही गमाविलं असलं, तरीही आपल्या मुलांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, याची खात्री त्यांना पदोपदी होती. त्यामुळंच ते कधीही खचलेले मी पाहिले नाहीत, असंही पौर्णिमा आवर्जून सांगतात...

पाच-दहा मिनिटे सुरू असलेला संवाद संपल्यानंतर खऱ्या अर्थाने मनापासून समाधान वाटले... माझ्याप्रमाणेच शेकडो नागरिकांनी त्यांच्याशी संवाद साधून कोठारी बंधूंच्या बलिदानाबद्दल आदर व्यक्त केला होता... माझे बंधू आणि आई-वडिलांबद्दल देशभरातील नागरिकांमध्ये असलेला आदरभाव पाहून मलाही खूप भरून येते आहे, अशीच भावना पौर्णिमा यांच्याकडून व्यक्त होत होती.

अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर उभे राहीलच. आता तर सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर मोहोर उमटविली आहे. राममंदिर उभारल्यानंतर त्याच परिसरात कोठारी बंधूंसह सर्वच्या सर्व अकरा जणांचे एक स्मारक उभारायला हवे. श्रद्धा, भक्ती आणि समर्पण भाव यांचे प्रतीक म्हणून...

Wednesday, August 21, 2019

आईच्या मायेनं काम करणाऱ्या राजकारणी...




विजयाताई रहाटकर यांचा आज वाढदिवस… औरंगाबादच्या माजी महापौर. भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणाऱ्या भाजपाच्या महिला नेत्या. विजयाताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… भविष्यात त्यांना अधिकाधिक जबाबदाऱ्या मिळत राहो आणि त्या यशस्वीपणे पार पाडण्याची ताकद ईश्वर त्यांना देवो, याच अगदी मनःपूर्वक शुभेच्छा… 

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने महिलांसाठी राबवविलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी विजयाताई महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देशभर दौरे करीत असतात. आज केरळमध्ये तर उद्या पंजाबमध्ये. परवा गुजरातमधील एखाद्या शहरात तर चौथ्या दिवशी ईशान्य भारतात… राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात विविध शहरांमध्ये महिलांसाठी वैविध्यपूर्ण उपक्रम आयोजित करत असतात… कधी कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठविण्यासंदर्भातील कार्यशाळा तर कधी बचत गटांच्या महिलांचे मेळावे अर्थात, प्रज्वलांचे प्रशिक्षण… कधी महिलांविषयीच्या कायद्यांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन, कधी सरोगसी संदर्भातील कार्यशाळा, तर कधी महिला मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक. दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत असताना राज्यात आणि देशात अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कानाकोपऱ्यांत फिरून सरकारच्या योजना नि निर्णयांची माहिती पोहोचविण्याचे काम विजयाताई आणि त्यांची टीम प्रभावीपणे करीत आहे. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आणि नरेंद्र मोदींसाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं. त्यामध्ये खूप मोठा वाटा भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाचा आणि अध्यक्ष विजयाताई रहाटकर यांचा निश्चित आहे. 


पण ही झाली विजयाताईंची राजकीय ओळख… मॅन ऑन मिशन महाराष्ट्र पुस्तकाच्या निमित्ताने विजयाताईंचे एक वेगळे रुप पहायला मिळाले. जे राजकारण्यापलिकडचे होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकिर्द तसेच राज्य सरकारच्या यशोगाथा पुस्तकबद्ध करण्याचा विचार जेव्हा पुढे आला तेव्हापासून माझा आणि विजयाताईंचा परिचय वाढला… राजकारणापलिकडे असलेलं हे व्यक्तिमत्व खूप छान पद्धतीने अनुभवयाला मिळालं.


मॅन ऑन मिशन महाराष्ट्रच्या निर्मितीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असला, तरीही त्यांनी हे पुस्तक लिहिताना त्यांनी संपूर्ण लेखन स्वातंत्र्य मला दिले होते, हे मी या निमित्ताने आवर्जून सांगेन. एखादी गोष्ट पुस्तकात घ्यायलाच हवी किंवा हा विषय पुस्तकात तुम्ही घेतला आहे, ती वगळाच असे त्या एकदाही म्हटल्या नाहीत. वास्तविक पाहता, राजकारणी व्यक्ती ही बहुतांश वेळा मनमानी पद्धतीनेच वागत असते. आपण म्हणू ती पूर्व दिशा अशी तिची वृत्ती असते. मात्र, विजयाताईंनी पुस्तक लिहिताना अशा पद्धतीने सक्ती किंवा जबरदस्ती कधीच केली नाही. त्यांनी लेखक म्हणून मला पूर्ण स्वातंत्र्य दिले आणि ते शेवटपर्यंत जपले. मी लिहिलेल्या पुस्तकात एका शब्दानेही त्यांनी फेरफार केली नाही. किंवा कोणामार्फत करायलाही लावली नाही. मला वाटतं हे विजयाताईंचं मोठेपण आहे. एक राजकारणी म्हणूनही आणि व्यक्ती म्हणूनही.

पुस्तकाच्या निमित्ताने महाराष्ट्रात विविध शहरांमध्ये फिरत असताना त्या अत्यंत आस्थेने आणि काळजीने विचारपूस करायच्या. एखाद्या शहरात पोहोचल्यानंतर किंवा राज्यात फिरत असताना तुम्हाला कुठे काही त्रास नाही ना, फिरताना अडचणी येत नाहीत ना, अशी विचारपूस त्या कायम करायच्या. शक्यतो रात्रीचा प्रवास करू नका, वेळेवर जेवत जा, स्वतःची काळजी घ्या, अशी आईच्या मायेने काळजीही घ्यायच्या. हल्लीच्या व्यावसायिक जगामध्ये अशा पद्धतीने मायेने दुसऱ्याची काळजी घेणारी राजकारणी व्यक्ती अगदी विरळच म्हटली पाहिजे. 


पुस्तकाच्या निमित्ताने औरंगाबादमध्ये पोहोचलो तेव्हा त्या देशभरात कुठेतरी दौऱ्यावर होत्या. साधारण संध्याकाळच्या सुमारास मी औरंगाबादला पोहोचलो. तेव्हा त्यांचा मला फोन आला. पोहोचलात का औरंगाबादला... मी म्हटलं हो अगदी पोहोचलो आणि आता जेवायलाच चाललो आहे. त्यावेळी त्या म्हणाल्या, की आज मी नेमकी औरंगाबादच्या बाहेर आहे. मी जर तिथे असते तर तुम्हाला घरीच जेवायला बोलाविले असते... काही अडचण आली, तर नक्की सांगा. औरंगाबादमध्ये तुम्ही आमचे पाहुणे आहात वगैरे... स्वतः मागे इतके व्याप असतानाही मी औरंगाबादला पोहोचल्यानंतर त्यांनी आठवणीनं माझी विचारपूस केली, ही देखील गोष्ट माझ्यासाठी धक्कादायक होती.

मुंबईत किंवा अगदी आताही औरंगाबादमध्ये गेल्यानंतर जेव्हा जेव्हा त्यांच्या घरी जाणे झाले, तेव्हा त्यांनी अगदी आस्थेने पाहुणचार केला. आपण राजकारणी आहोत किंवा देश पातळीवरील कोणीतरी मोठी व्यक्ती आहोत, नेता आहोत ही सर्व कवचकुंडले बाजूला ठेवून त्या वावरतात. चहापाण्यापासून ते जेवणापर्यंत सर्व गोष्टींची आस्थेवाईकपणे चौकशी करतात. नाश्त्याची वेळ असेल, तर नाश्ता किंवा जेवणाची वेळ असेल तर जेवण करूनच पाठवितात. जेव्हा जेव्हा त्या भेटतात, तेव्हा प्रत्येक वेळी काळजी घेणाऱ्या आईच्या मनाचं दर्शन त्यांच्या ठायी घडतं. मला वाटतं एक राजकारणी म्हणून त्या नक्कीच मोठ्या आहेत. पण मायेनं काळजी घेणारं त्यांचं आईचं रुप मला अधिक भावतं. 


मुंबईमध्ये मॅन ऑन मिशन महाराष्ट्रच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी देखील त्यांच्या दिलदारपणाचं दर्शन मला झालं आणि त्यामुळं आयुष्यभरासाठी पुरेल, असा अनुभव मिळाला. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात मला बोलण्याची, माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली ती केवळ त्यांच्यामुळेच. आशिष हा महाराष्ट्रात सर्वत्र फिरून आला आहे आणि त्यानंतर त्यानं पुस्तक लिहिलं आहे. त्यामुळं त्याला त्याचं मत मांडायची संधी मिळाली पाहिजे, यावर त्या अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत ठाम राहिल्या. त्यांच्यामुळेच मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आणि इतर कॅबिनेट मंत्र्यांसमोर पाच-आठ मिनिटं बोलण्याची संधी मिळाली, हे आवर्जून नमूद केलं पाहिजे. 

अगदी परवा ‘Academics 4 Devedndra’ च्या थिंकर्स मीटसाठी औरंगाबादला गेलो तेव्हाही नेहमीसारखाच अनुभव आला. कार्यक्रम संपून नंतर गप्पाटप्पा आणि जेवण वगैरे व्हायला साधारण अकरा वाजले होते. सकाळी लवकर उठून आम्ही ड्राइव्ह करीत औरंगाबादला पोहोचलो होतो. त्यानंतर कार्यक्रमाची गडबड. त्यामुळं फारशी विश्रांती झाली नव्हती. ही सर्व पार्श्वभूमी त्यांना माहिती होती. त्यामुळं आज आता रात्री तुम्ही पुण्यासाठी निघू नका. इथेच औरंगाबादला रहा आणि सकाळी लवकर उठून निघा म्हणजे लवकर पोहोचाल. नात्यामध्ये किंवा दोस्तीत अशा पद्धतीनं काळजी करणारी माणसं नक्की असतात. पण एखादा राजकारणी जर इतकी काळजी करीत असेल, तर तो नक्कीच इतरांपेक्षा वेगळा आहे, असं मला वाटतं. 


मोठ्या पदांवर पोहोचूनही अत्यंत जमिनीवर असलेल्या नेत्या म्हणजे विजयाताई असं मला वाटतं. मी आतापर्यंत जितक्या वेळा त्यांना भेटलो आहे, तितक्या वेळा मला हेच जाणवलं आहे. कायम स्वतः पुढे पुढे न करणाऱ्या आणि ज्याचं श्रेय त्याला देणाऱ्या अशा वेगळ्या प्रकारच्या राजकारणी आहेत. त्या आपल्या बरोबर असलेल्या प्रत्येकाची काळजी करणाऱ्या आहेत. त्यामुळेच राज्यातील प्रत्येक महिलेला राज्य महिला आयोग हा आपल्या माहेरासारखा वाटला पाहिजे, असं त्या कायम म्हणतात. राजकारणात असूनही आईची ममता शाबूत ठेवणाऱ्या व्यक्तीलाच हे सुचू शकतं नि तीच व्यक्ती अशा पद्धतीनं विचार करू शकते.

विजयाताई, आपण अत्यंत अविश्रांतपणे पक्षासाठी आणि महिला आयोगासाठी झटत आहात. त्यामुळेच राज्य महिला आयोग आणि भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या प्रमुखपदी आपली सलग दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे. झपाटून काम करण्याचेच हे फळ आहे. भविष्यातही तुम्हाला मोठ्या जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळो आणि त्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्याची ताकद आपल्याला मिळो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना...

Thursday, June 13, 2019

अनंतराव... उत्साहाचा झरा...



आज सकाळी अनंतराव गेले. वय वर्षे ८६. अखेरच्या दिवसापर्यंत चालत-फिरत होते, बोलत होते. आज सकाळी त्यांनी विश्रांती घेतली. कदाचित त्यांच्या आयुष्यातील ही पहिलीच विश्रांती असावी. पूर्वी च्यवनप्राशची एक जाहिरात होती. त्यात एक संवाद होता. साठ साल के बूढे या साठ साल के जवान… ती जाहिरात अनंतरावांना अगदी तंतोतंत लागू होती. अनंतराव म्हणजे कायमच तरुण वाटायचे. त्यांचं वय वाढलं, वार्धक्य आलं, तरी कार्यप्रवृत्तीत वार्धक्याची लक्षणं कधीच दिसली नाहीत. ना त्यांच्या हाती कधी काठी आली. ना कधी अनंतरावांच्या चालण्याचा वेग मंदावला. एका हातात छोटी बॅग घेऊन लगबगीने कुठेतरी जाणारे अनंतराव आता पुन्हा कधीच दिसणार नाहीत. उत्साहाचा एक अखंडपणे वाहत असलेला झरा आज शांत झाला.

अनंतराव म्हणजे कायम काही ना काही कामामध्ये स्वतःला गुंतवून ठेवणारा माणूस. त्यांची आणि माझी पहिली ओळख झाली माझ्या लहानपणीच झाली. अस्मादिकांचे फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड रवी पत्की ते त्यावेळी आमच्या वॉर्डचे भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. त्यावेळी अनंतराव मला पहिल्यांदा भेटले. मी अगदीच लहान होतो. पण प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा उत्साह आणि पुढाकार घेण्याची वृत्ती अजूनही लक्षात आहे. भारतीय जनता पार्टीचं काम असो, गणेशोत्सव किंवा लोकमान्यनगर भाडेकरू संघाचं काम असो, शाळा समितीचे काही काम असो किंवा दत्तमंदिराचं काम असो अनंतराव सर्वात पुढे. बरं दोन-पाच वर्षे नाही, तर गेली अनेक वर्षे ते या कामामध्ये कार्यरत होते. एक नाहीतर दुसरं, हे नाहीतर ते असं सुरू असायचं. कोणताही उपक्रम किंवा संस्था घ्या अनंतरावांनी आहेतच. लोकमान्यनगर आणि अंनतराव हे कधीच एकमेकांपासून वेगळं करता येणार नाही.

अनंतराव व्यवसायाने रंगभूषाकार अर्थात मेकअप आर्टिस्ट होते. ती सर्व कामं आणि दौरे वगैरे सांभाळून अनंतरराव इतर सर्व व्याप सांभाळायचे. आमच्या भागात त्यावेळी भाजपाचे तीन मुख्य खांब होते. एक आमच्या कॉलनीतील अनंतराव जोशी, दुसरे चिमणबागेतील माधवराव कानिटकर आणि तिसरे नवी पेठेतील कुर्डेकर. मतदारयाद्या कशा पहायच्या, स्लिपा कशा लिहायच्या, पत्रकं वगैरे वाटताना कसं बोलायचं हे त्यांच्याकडूनच शिकायला मिळायचं. १९९२ साली विजयाताई केंजळे आमच्या वॉर्डातून निवडणूक लढवित होत्या. त्यावेळी प्रत्येक घरी मतदान स्लीपबरोबर अक्षता देऊन मतदानाला निमंत्रित करण्याची शक्कल अनंतरावांनी लढविली होती. विजयाताई त्यावेळी पराभूत झाल्या आणि वंदना चव्हाण निवडून आल्या. निवडणूक महापालिकेची असो किंवा पदवीधरची अनंतराव प्रत्येक ठिकाणी हिरीरीनं पुढंच असायचे.

 
   (अनंतरावांकडे जाताना कायम नजरेस पडणारी ही भिंत...)

निवडणुकीच्या दिवशी अनंतरावांच्या घरीच कार्यकर्त्यांचं जेवण असायचं. मी तर तेव्हा अगदीच लहान होतो. पण अनंतरावांच्या बरोबर असल्यामुळं निवडणूक, प्रचार नि मतदानाच्या दिवशी असणारी यंत्रणा, पोलिंग एजंट आणि इतर सर्व प्रक्रिया अगदी जवळून पहायला मिळाल्या. अनुभवायला मिळाल्या. अनंतरावांनी पक्षाकडे स्वतःसाठी कधी तिकिट मागितलं की नाही माहिती नाही. पण पक्षाचा जो उमेदवार असेल त्याचा प्रचार अनंतराव मनापासून करायचे. मालतीबाई परांजपे, नंदू फडके आणि इतर नेते उमेदवारांच्या वेळच्या आठवणी ते रंगात आले की सांगायचे. १९९०मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपासून तर मला ते अगदी लख्ख आठवतायेत. तेव्हा शिवसेना-भाजप युतीचे शशिकांत सुतार आमच्याकडे उमेदवार होते. तेव्हापासून अगदी आता पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही अनंतराव सक्रिय होते.

 
   (२०१७च्या महापालिका निवडणुकीदरम्यान अनंतरावांची झालेली भेट...)

लोकमान्यनगर भाडेकरू संघ आणि आताचा सदनिकाधारक संघ, बालविकास मंदिर यांचा गाडाही अनंतरावांनी अनेक वर्षे हाकला. पाण्याची बिलं तयार करणं, त्यांची वसुली कऱणं, लाइटची बिलं वाटणं वगैरे कामं अनंतरावांनी अनेक वर्षे केली. लोकमान्यनगरचा पुनर्विकास हा गेली अनेक वर्षे रखडलेला प्रश्न आहे. त्यासाठीही अनंतरावांची धडपड सुरू होती. आज ना उद्या पुनर्विकास होईल, या आशेवर ते होते. मध्यंतरी सदनिकाधारक संघाची सूत्रे कॉनलीतील काही तरूण मंडळींनी त्यांच्याकडून स्वीकारली. अनंतराव, तुम्ही खूप वर्षे कष्ट केले. आता तुम्ही विश्रांती घ्या. आम्ही बघतो सगळं, असं आम्ही त्यांना म्हटलं. त्यावेळी अनंतराव काहीसे नाराज झाले होते. पण ती नाराजी त्यांनी कधीच बोलून दाखविली नाही. की आमचे संबंध दुरावले नाहीत. त्यांना हटविण्यासाठी आम्ही सूत्रे हातात घेतली नव्हती हे त्यांना कदाचित कळलं असावं. गेली चार-पाच वर्षे सर्व कारभार पाहताना आमच्या नाकात दम येतोय. अनंतरावांनी इतकी वर्षे कसं सांभाळलं असेल, हे आता समजतंय.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी शेवटी मन की बात केली. तेव्हा तो कार्यक्रम सार्वजनिकरित्या साजरा करण्याचे आदेश भाजपा कार्यकर्त्यांना होते. कॉलनीतील दत्तमंदिर चौकात झालेल्या कार्यक्रमाला अनंतराव आवर्जून उपस्थित होते. तसंही ते पक्षाच्या जवळपास प्रत्येक कार्यक्रमाला ते उपस्थित असायचे. आमच्या भागातील प्रचार त्यांची भेट घेतल्याशिवाय पूर्णच व्हायचा नाही. धीरज घाटेच्या आई-वडिलांच्या पंच्याहत्तरीचा कार्यक्रम झाला, त्याला अनंतराव उपस्थित होते. तीच आमची अखेरची भेट. कार्यक्रमाला आले तेव्हा अनंतरावांना म्हटलं, अनंतराव बसा. त्यावेळी ते मला म्हटले, तू म्हणतोयस म्हणून बसतो. नाहीतर अजूनही मी उभा राहू शकतो. आणि अनंतराव कितीही वेळ उभे राहू शकले असते, हे अगदी निश्चित.

वैयक्तिक आयुष्यात अनेक संकटांना त्यांना सामोरं जावं लागलं. अनेक दुःख पदरी आली. पण भेटल्यानंतर त्यांनी त्याचं रडगाणं कधीही गायलं नाही. कधी त्याबद्दल तक्रार केली नाही. वेगवेगळ्या कामांमध्ये त्यांनी स्वतःला गुंतवून ठेवलं. कायम कार्यरत राहिले. त्यांना स्वस्थ बसलेलं कोणीच पाहिलं नाही. देवाची साथ म्हणा किंवा दैवाची साथ म्हणा, अनंतराव शेवटपर्यंत ठणठणीत होते. वयाच्या ८६व्या वर्षीही एकटे रहायचे. स्वतःचं स्वतः करायचे. अगदी शेवटचे काही दिवस त्यांना थोडा त्रास झाला असेल तोच. त्यापलिकडे काही नाही. त्यांना आरोग्याचं वरदानच होतं म्हणा ना. खणखणीत बोलणं, अधून मधून तिरकस विनोद करण्याची वृत्ती आणि स्मरणशक्ती या गोष्टी अखेरपर्यंत कायम होत्या.



प्रचाराला मोठ्या संख्येनं कार्यकर्तेही मिळणं कठीण, झोपडपट्ट्या ऑप्शनला टाकणं किंवा उमेदवार पराभूत होणार हे माहिती असूनही जीव तोडून प्रचार करणं इथपासून अनंतराव पक्षासाठी झटत होते. त्यामुळे अनंतरावांना सध्याचे दिवस एकप्रकारे आनंद देणारेच म्हटले पाहिजे. एकीकडे धीरजनं प्रचंड मेहनतीनं बांधलेला आमचा वॉर्ड आणि संघटन कौशल्याच्या आधारावर जोडलेले असंख्य कार्यकर्ते आणि दुसरीकडे सलग दुसऱ्यांदा स्वबळावर केंद्रामध्ये सत्तेवर आलेला भारतीय जनता पक्ष… दोन से दोबारा हे दृष्य अनंतरावांनी याचि देही याचि डोळा पाहिले.

लोकमान्यनगरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीचे तीन खंदे आधारस्तंभ गेल्या वर्षभरात काही महिन्यांच्या अंतराने मरण पावले. पहिले प्रा. शरद वाघ, दुसरे आमच्या भागात संघाचे काम रुजविणारे-वाढविणारे भालचंद्र कोल्हटकर तथा भालजी आणि आता अनंतराव जोशी. प्रत्येकाचा कॅनव्हास वेगळा. कामाचा आयाम वेगळा. कामाची व्याप्ती वेगळी. पण विचारांवर निष्ठा, समर्पित वृत्ती आणि कामाचा झपाटा एकसमान.

आयुष्यभर ज्या विचारासाठी खस्ता खाल्ल्या त्या विचाराला देशातील जनतेने बहुमताने आपलेसे केले आहे, स्वीकारले आहे, ही परिस्थिती अशा सर्व समर्पित कार्यकर्त्यांसाठी दिलासादायक अशीच आहे.


विनम्र आदरांजली...

Wednesday, May 15, 2019

येणार का मोदी?


भाजपाला किती मिळणार जागा...

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काय होणार, हा प्रश्न देशामध्ये सर्वाधिक चर्चिला जातो आहे. येणार तर मोदीच…असं कोणी कितीही म्हणत असलं तरीही नेमक्या किती जागा येणार, भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करणार की मित्रपक्षांची मदत लागणार, नवे मित्रपक्ष जोडावे लागणार का, काँग्रेसच्या पुढाकाराने विरोधी पक्षांचे सरकार सत्तेवर येणार का, अशा अनेक प्रश्नांनी माहोल गरम झाला आहे. त्यात रोज कोणतरी नवे अंदाज बाहेर काढतोय, कोणतरी सट्टाबाजारातील आकडे फिरवतोय, कोणी टिनपाट ज्योतिषी असं होणार तसं होणार म्हणून पुड्या सोडतोय. अशा परिस्थितीत नेमकं काय होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

उत्तर प्रदेश कोणाचा?
दिल्लीतील सत्तेचा राजमार्ग उत्तर प्रदेशातून जातो, हे वाक्य पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे. म्हणजे यंदा भारतीय जनता पार्टी केंद्रात सत्तेवर येणार का, किती जागा मिळवून सत्तेवर येणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे ही उत्तर प्रदेशात काय होणार, यावर अवलंबून आहे. उत्तर प्रदेशात जर भाजपाला जास्त फटका बसला नाही आणि अगदी थोड्या जागा कमी झाल्या तर भाजपा सुखरूपपणे आणि अधिक धावाधाव न करता केंद्रात सत्तेवर येईल, अशी परिस्थिती आहे. पण जर उत्तर प्रदेशने दगा दिला, तर भाजपाची परिस्थिती बिकट असणार हे नक्की…

उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीने महागठबंधन केल्यामुळे निवडणुकीत रंगत आली आहे. हे दोन्ही पक्ष जर वेगवेगळे लढले, असते तर कदाचित भाजपा पुन्हा एकदा ७३चा चमत्कार करू शकला असता. पण बुवा-भतीजा यांनी भाजपसमोर चांगलेच आव्हान निर्माण केले आहे. दोन्ही पक्षांच्या आपापल्या व्होट बँका आहेत. म्हणजे यादव आणि मुस्लिम ही समाजवादी पार्टीची व्होट बँक आहे. तर मागासवर्गीय प्रवर्गातील चर्मकार समाज मायावती यांच्या पाठिशी आहे. मागील निवडणुकीत बसपाला एकही जागा मिळाली नसली, तरीही त्यांच्या मतांच्या टक्केवारीत मोठी घसरण दिसत नाही. 

मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की ही निवडणूक २०१४ची निवडणूक नाही. गेल्या वेळी उत्तर प्रदेशात फिरताना नरेंद्र मोदी या माणसाबद्दल लोकांना प्रचंड औत्सुक्य होते. एकदा तरी संधी दिली पाहिजे, अशी भावना लोकांमध्ये होती. त्यामुळे मतदारांनी जातीपातीच्या पलिकडे जाऊन भाजपाला संधी दिली. मुस्लिमांनीही भाजपाला मते दिली, असे सांगितले जात असले तरीही गेल्या निवडणुकीत मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर मतदानाला बाहेर पडलाच नाही. आपण कोणालाही मतदान केले, तरी मोदींना येणारच ही त्याची खात्री होती. त्यामुळे त्याने घरातच बसणे पसंत केले. पण यंदा तशी परिस्थिती नाही. 

उत्तर प्रदेश हा जातीपातींमध्ये विभागलेला आणि सर्वाधिक आधी जातीचा विचार कऱणारा प्रांत आहे. त्यामुळे जातीय समीकरणांच्या पलिकडे तिथली निवडणूक कितपत जाईल, हा औत्सुक्याचा आणि संशोधनाचा विषय आहे. उत्तर प्रदेशात जवळपास १९ टक्के मुस्लिम, २१ टक्के दलित आणि नऊ ते दहा टक्के यादव समाज आहे. एकूण ८० पैकी ४७ मतदारसंघामध्ये यादव, मुस्लिम आणि दलित  मतदारांची टक्केवारी ५० पेक्षा अधिक आहे. गंमत म्हणजे दहा मतदारसंघ असे आहेत, जिथे मुस्लिम-दलित-यादव हे कॉम्बिनेशन ६० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. एकूण ३७ मतदारसंघ असे आहेत, जिथे हे कॉम्बिनेशन ५० ते ६० टक्क्यांदरम्यान आहे. तर ३३ मतदारसंघ असे आहेत, जिथे या समाजांचे एकत्रित मतदार ४० ते ५० टक्क्यांदरम्यान आहेत. 


गेल्या निवडणुकीत मतदारांनी आपल्या जातीच्या पलिकडे जाऊन मोदींच्या पारड्यात मते टाकली होती. तोच करिष्मा उत्तर प्रदेश विधानसभेला कायम राहिला. मात्र, सपा आणि बसपा युती झाल्यामुळे आता गणिते बदलण्याची शक्यता आहे. त्यांंना राष्ट्रीय लोकदलाचीही साथ मिळाली. तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांच्या उमेदवारांचा मनापासून प्रचार करीत आहेत आणि व्होट्स ट्रान्सफर होत आहेत, असे आतापर्यंतचे रिपोर्ट्स आहेत. जीवन मरणाची परिस्थिती आहे, त्यामुळे दोन्ही पक्ष परस्परांना दगाफटका करण्याची शक्यता फार कमी आहे. मुलायमसिंह यांनी केलेली मायावतींची स्तुती आणि अखिलेश यांनी मायावतींना वाकून केलेला नमस्कार ही त्याचीच उदाहरणे आहेत. 

तिन्ही पक्षांचे महागठबंधन छान टिकले आहे. पण काही ठिकाणी जागावाटपात थोडीशी गडबड झालीय. काही यादवबहुल जागा बसपाला सुटल्या आहेत. तर काही दलित बहुल जागांवर सपाचे उमेदवार उभे आहेत. अशा जागा अगदी कमी असल्या, तरीही तिथे कार्यकर्त्यांमध्ये थोडीशी नाराजी आहे. अशा जागांवर परस्परांना व्होट ट्रान्सफर कशा पद्धतीने होते, त्यावरही महागठबंधनचे नि पर्यायाने भाजपाचे भविष्य ठरणार आहे. 

भाजपाने यादव समाजवगळला ओबीसी आणि चर्मकारवगळता मागासवर्गीय समाजाची मोट बांधली आहे. ती सर्व मते आपल्या बाजूला वळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शिवाय ब्राह्मण आणि ठाकूर ही हक्काची व्होटबँक त्यांच्या पाठिशी आहेच. अर्थात, काही ठिकाणी काँग्रेसने ब्राह्मण आणि ठाकूर उमेदवार देऊन भाजपाची मते पळविण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि सपा-बसपा यांच्यात बऱ्यापैकी अंडरस्टँडिंग असल्याचं दिसतंय. त्यामुळं जिथं एका पक्षाचा उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे तिथं दुसऱ्या पक्षानं मुद्दाम बलाढ्य उमेदवार दिलेला नाही. जेणे करून फाटाफुटीचा फायदा भाजपाला होणार नाही. 

आणखी एक गोष्ट म्हणजे उत्तर प्रदेशातील अनेकांचे म्हणणे आहे, की अखिलेश आणि मायावती यांचा आम्ही राज्यासाठी विचार करू. पण देशॉसाठी मोदीच ठीक वाटतात. हा मुद्दाही लक्षणीय ठरू शकतो.  भाजपाच्या मदतीला उज्ज्वला योजना, पंतप्रधान आवास योजना आणि जनधन वगैरे गरीबांसाठीच्या कल्याणकारी योजना धावून येणार हे निश्चित आहे. म्हणजे पाच वर्षांची अँटी इन्कम्बन्सी, स्थानिक उमेदवारांबद्दलची नाराजी आणि महागठबंधन यांच्यामुळे बसणारा फटका कमीत कमी असेल. म्हणजे २५ ते ३० जागांपुरतीच भाजपा मर्यादित राहिली असती. त्यांना आता अधिक जागा मिळतील, अशी परिस्थिती सांगते. अर्थात, म्हणजे किती त्यावर सर्व गणितं अवलंबून आहेत. साधारण ४०च्या आसपास जागा मिळायला हरकत नसावी.

राज्याराज्यांत काय होईल?
मुळात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील नरेंद्र मोदी सरकारबद्दल जनमत चांगलेच आहे, अशी परिस्थिती नाही. म्हणजे एकहाती बहुमत मिळण्याची शक्यता कमीच आहे, याचा अंदाज भाजपा धुरिणांना खूप आधीच आला होता. त्यामुळेच भाजपाने बिहारमध्ये संयुक्त जनता दलाशी नुकसान सोसून आघाडी केली. २१ ऐवजी १७ जागाच लढविण्याचा निर्णय घेतला. पाच वर्षे शिवसेनेकडून शिव्या खाल्ल्यानंतरही भाजपाला त्यांचीच साथ मोलाची वाटली. म्हणजे जुन्या मित्रांना परत घेतल्याशिवाय यंदा सत्तासोपान चढता येणार नाही, हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी ओळखले होते. त्यामुळेच त्यांना काहीशी पडती बाजू घेऊनही जुन्या दोस्तांना बरोबर घेणे भाग पडले. अन्यथा भाजपाने मित्रांना हिंग लावूनही विचारले नसते.


गेल्या निवडणुकीत २०१४मध्ये भाजपा यशाच्या अत्युच्च शिखरावर होता. यंदा त्यापेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावा भाजपाचे सर्वच नेते करत आहेत. पण त्यात फारसा दम वाटत नाही. कारण लोकांशी, सर्वसामान्यांशी चर्चा करताना काही प्रमाणात विरोध जाणवतो आहेच. म्हणजे गेल्या वेळेस होती तशी लाट यंदा नाही. भाजपाचे नेते आणि संघाचे पदाधिकारी म्हणतात तशी सुप्त लाट असेलच तर ती जाणवत नाही. त्यामुळे सुप्त लाटेमुळे भाजपला ३०० किंवा त्यापेक्षा अधिक जागा मिळाल्या तर आपले सपशेल लोटांगण. किमान मला तरी जाणवली नाही. ज्यांच्या ज्यांच्याशी बोललो त्यांना तरी एकतर्फी विजय वाटत नाही. म्हणजेच भाजपाला प्रत्येक ठिकाणी नुकसानच सहन करायचे आहे. अपवाद फक्त पश्चिम बंगाल आणि ओरिसाचा… 

बिहारमध्ये भाजपाच्या जागा गेल्या वेळेसच्या तुलनेत कमीच होणार आहेत. मुळात ते लढवितच कमी आहेत. मित्रपक्षाच्या जागा मात्र, दोनवरून दोन आकडी नक्की होतील. उत्तर प्रदेशातही ३० ते ३५ जागांचा फटका हमखास बसणार आहे. मध्य प्रदेशात भाजपाला २९ पैकी १८ ते २० जागा मिळण्याचा अंदाज आहे. राजस्थानात भाजपाला थोडा जास्त फटका बसण्याची शक्यता आहे. म्हणजे किमान सहा ते दहा जागांचा. छत्तीसगडमध्ये भाजपाचा सुपडा साफ होणार हे जवळपास निश्चित आहे. गुजरातेत भाजपच्या तीन ते चार जागा कमी होतील, असा अंदाज आहे. गेल्या निवडणुकीत राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीतसगड या चार राज्यांत भाजपाला ९१ पैकी केवळ तीन जागांवर पराभव पत्करावा लागला होता. यंदाचे नुकसान मोठे असणार आहे.

महाराष्ट्रातही गेल्या वेळेसच्या तुलनेत फटकाच आहे. माझ्या अंदाजानुसार भाजपा-शिवसेना युती ३० ते ३५च्या दरम्यान राहील. राष्ट्रवादी काँग्रेस ८ ते १० आणि काँग्रेस ४ ते ६ जागांवर विजयी होईल. गोव्यातही दक्षिणेची जागा भाजपकडून निसटू शकते. पंजाबमध्येही १३ पैकी दहा जागांवर काँग्रेस आरामात जिंकेल, अशीच परिस्थिती आहे. कर्नाटकातही भाजपाने २८ पैकी १७ जागांवर विजय मिळविला होता. यंदा त्यात एक ते दोन जागांचा फरक पडू शकतो. पण तो पुरेसा नाही. तेलंगण आणि आंध्र प्रदेशात भाजपाला प्रत्येकी एक आणि दोन जागा मिळाल्या होत्या. यंदा त्यात वाढ होण्याची शक्यता धूसर वाटते. 


तमिळनाडूत भाजपाने अण्णा द्रमुकशी आघाडी केली आहे. मात्र, तिथे यंदा द्रमुकचा अर्थात, स्टॅलिन यांचा जोर आहे. त्यामुळे तेथील ३९ आणि पुदुच्चेरीची एकमेव अशा एकूण ४० जागांपैकी द्रमुक-काँग्रेस आघाडीच्या वाटेला ३२ पेक्षा अधिक जागा येतील. भाजपाच्या वाटेला एखाद दुसरीच जागा येऊ शकते. गेल्या निवडणुकीत हिमाचल प्रदेशात चारपैकी चार, हरिय़ाणात दहापैकी सात, दिल्लीत सातपैकी सात, उत्तराखंडमध्ये पाचपैकी पाच जागा भाजपाने जिंकल्या होत्या. त्यामुळे यंदा तिथे वाढ शक्य नाही. उलट असलीच तर जागा टिकविण्यासाठीच लढाई आहे. विशेषतः दिल्लीत.

ईशान्य भारतात एकूण २४ जागा आहेत. त्यापैकी गेल्या निवडणुकीत भाजपाने आठ जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी त्रिपुरातील दोन आणि आसाममधील १४ पैकी अधिक जागा भाजपाच्या वाट्याला जाऊ शकतात. मात्र, त्या फार तर दुप्पट होतील. त्यापलिकडे आकडा सरकण्याची शक्यता कमीच वाटते. अशा परिस्थितीत पश्चिम बंगाल आणि उडिशा ही राज्ये भाजपासाठी दिलासादायक ठरणार आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपाला पश्चिम बंगालमध्ये ४२ पैकी २ जागांवर समाधान मानावे लागले होते. यंदा वातावरण खूप चांगले असले, तरीही दोनच्या फार तर १२ जागा होऊ शकतात. मोदी आणि शहा यांनी पश्चिम बंगालवर विशेष लक्ष केंद्रीत केलंय. जोर लावलाय. प. बंगालमध्ये मुस्लिम धर्मियांची टक्केवारी ३० टक्के आहे. आसामप्रमाणेच धार्मिक ध्रुवीकरण करून पश्चिम बंगाल जिंकण्याचे भाजपाचे मनसुबे आहेत. काही ठिकाणी माकपचीही त्यांना मदत होते आहे. मात्र, अमित शहा म्हणतात तसा २२ किंवा २३चा आकडा कठीण आहे. भाजपा १० ते १२ पर्यंतच मर्यादित राहील, अशी परिस्थिती सांगते. तर उडिशामध्ये २१ पैकी एक जागा जिंकणारा भाजपा यावेळी आठ ते दहापर्यंत मजल मारू शकतो. 


केरळमध्ये शबरीमलाच्या मुद्द्यामुळे काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. शबरीमला आंदोलन संघ परिवाराने पेटविले असले, तरीही त्याचा फाय़दा उठविण्याइतपत भाजपाचे संघटन पुरेसे मजबूत नाही. शिवाय धार्मिक समीकरणेही बाजूने नाहीत. अशा परिस्थिती भाजपाचा एक जागा जिंकून चंचूप्रवेश होऊ शकतो. पण काँग्रेसने योग्यवेळी आंदोलनात उडी घेतली आणि सरकारविरोधी भूमिका घेऊन परिस्थितीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न केला. त्याचा फायदा यंदा काँग्रेसला होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. म्हणजे केरळमध्ये २०पैकी १४ ते १५ जागांवर ते विजयी होऊ शकतात.

थोडक्यात म्हणजे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाला देशभरात ८० ते ९० जागांचा फटका बसेल आणि २५ ते ३० नव्या जागा त्यांच्या वाट्याला येतील. अशा परिस्थिती भाजपाचा आकडा २८२ वरून घटून २०० ते २२० च्या आसपासच स्थिरावण्याची शक्यता वाटते. अर्थात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि उडिशा यांच्यावर सर्व काही अवलंबून आहे.

नरेंद्र मोदींची स्वतःची व्होटबँक
गेल्या निवडणुकीपासून नरेंद्र मोदी यांनी स्वतःची व्होट बँक तयार केली आहे. त्यामध्ये महिला, मध्यमवर्गीय आणि तरुण यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ही व्होटबँक भाजपाच्या पारंपरिक मतदारांपेक्षा वेगळी आहे. त्यांचे मोदींवर प्रेम आहे. ही मंडळी गेल्या निवडणुकीत एकदिलाने मोदींच्या बाजूने उभी राहिली होती. त्यांचा मोदींवर अजून किती विश्वास आहे, यावर मोदींचे आणि पर्यायाने भाजपाचे भविष्य अवलंबून आहे. नवमतदार हा देखील भाजपासाठी आशा आहे. अर्थात, सर्वच ठिकाणचे नवमतदार भाजपाचे आहेत, अशा भ्रमात राहण्याची आवश्यकता नाही.

शहरी विरुद्ध ग्रामीण
यंदाची निवडणूक शहरी विरुद्ध ग्रामीण अशा स्वरुपाची आहे, असे वाटते. शहरी भागात भाजपा किंवा नरेंद्र मोदी यांना फारसा विरोध नाही. म्हणजे तसा तो दिसत नाही. ग्रामीण भागात तसे चित्र नाही. उज्ज्वला योजना, पंतप्रधान आवास योजना आणि जनधन सारख्या योजनांमध्ये अनेकांना फायदा झाल्याचे चित्र आहे. तरीही गेल्या निवडणुकीइतकी मोदी लाट ग्रामीण भागात जाणवत नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे. शिवाय अनेक ठिकाणी भाजपाने चुकीचे उमेदवार दिले आहेत. लोकांचा विरोध मोदींना नाही, तर स्थानिक उमेदवाराला आहे, असे चित्र काही ठिकाणी दिसते. जसे पुण्यात जर भाजपाने गिरीष बापट यांच्याऐवजी जर संजय काकडे यांना तिकिट दिले असते, तर मोदींकडे पाहून किती जणांनी काकडे यांना मत दिले असते, हा अभ्यासाचा विषय होऊ शकतो. अशीच परिस्थिती काही ठिकाणी आहे. विशेषतः हिंदी पट्ट्यात. त्यामुळेच मोदी सर्व सभांमध्ये तुमचे मत मला आहे, स्थानिक उमेदवाराला नाही, असे सांगत आहेत. २०१४ ला ते चालले. पण यंदा चालेल का माहिती नाही. 

काँग्रेसची न्याय योजना लोकांना किती आपलीशी वाटते हे देखील महत्त्वाचे वाटते. घरबसल्या गरीब कुटुंबांना वार्षिक ७२ हजार रुपये मिळणार, हे आश्वासन आमिषासारखेच आहे. शिवाय आवाक्यातील वाटते. त्यामुळेच भाजपने शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केलेले दोन हजार रुपये आणि इतर फुकट गोष्टींवर गरीब मतदार पुन्हा विश्वास टाकतात की काँग्रेसच्या ७२ हजारांच्या आश्वसनावर विश्वास ठेवतात, त्यावरही ग्रामीण भाग कोणाच्या पारड्यात झुकतो, यावर बरेच काही अवलंबून आहे.

२००९ सारखे होईल?
वास्तविक पाहता, २००४ आणि २००९ च्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर आली. पहिल्यांदा त्यांना बहुमत नव्हते. पण डाव्यांच्या पाठिंब्यावर त्यांनी सत्ता स्थापन केली. डॉ. मनमोहनसिंग यांची पहिली पाच वर्षे तुलनेने स्वच्छ होती. गैरप्रकार, भ्रष्टाचाराचे आरोप नव्हते. त्यामुळे २००९च्या निवडणुकीत काँग्रेसच्या जागा अनपेक्षितपणे वाढल्या. तसाच काहीसा प्रकार नरेंद्र मोदी यांच्याबाबतही होऊ शकतो का, हा चर्चेचा विषय आहे. पण २००४मध्ये काँग्रेस यशाच्या शिखरावर नव्हती. काठावर पास झालेली होती. २०१४ला मोदी यशाच्या शिखरावर होते. ती कामगिरी मागे टाकून नवा उच्चांक गाठण्यासाठी पुन्हा तशीच लाट जाणवायला हवी. तशी लाट यंदा जाणवत नाही. उलट काही प्रमाणात विरोधातच वातावरण वाटते आहे. त्यामुळे २८२चा आकडा पार करून भाजपा पुढे जाण्याची शक्यता फारच थोडी आहे, असे म्हणावेसे वाटते. 

नरेंद्र मोदींचे मुद्दे आणि देहबोली
सुरुवातीला बालाकोट आणि हुतात्मा जवान वगैरे मुद्द्यांभोवती फिरणारा प्रचार शेवटी भावनिक मुद्द्यावर गेलाच. नरेंद्र मोदींची ही स्टाइल आहे. निवडणुकीपूर्वी विकासकामे वगैरे करायची. पण शेवटी प्रचार भावनिक मुद्द्यांवर करूनच मते मिळवायची. गोध्रानंतर तर नरेंद्र मोदींना केकवॉक होता. २००७ मौत का सौदागरने नरेंद्र मोदींचे काम सोपे केले. २०१४मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे वाटत असेल, तर आता त्यांनाच बहुमताने विजयी करा, ही मोहीम २०१२च्या निवडणुकीत राबविण्यात आली. २०१७ला तर भाजप हरला, तर पाकिस्तानात फटाके फुटतील, मला पराभूत करण्यासाठी पाकच्या पदाधिकाऱ्यांबरोबर काँग्रेसची बैठक आणि हातमिळवणी वगैरे… असे वेगळेच मुद्दे काढून मोदी निवडणूक मारली. २०१७ला भाजपा थोडक्यात वाचला.

लोकसभा निवडणुकीतही नरेंद्र मोदींनी मी मागास समाजाचा आहे, मी अतिमागास समाजाचा आहे, काँग्रेस त्यामुळेच माझ्यावर टीका करते, पंडित नेहरू, राजीव गांधी यांची आयएनएस विराट सफर वगैरे बिनकामाचे मुद्दे उकरून काढले आणि मतांचा जोगवा मागितला. मी गरीब आहे, मी मागास समाजाचा आहे, म्हटल्यावर आजही देशात मते मिळतात, असा त्यांचा कयास असावा म्हणूनच त्यांनी ही रणनिती आखली असावी. पण माझ्या मते भाजप अडचणीत आल्यामुळेच त्यांना भावनिक आणि नको त्या मुद्द्यांना हात घालावा लागला आहे. अन्यथा २०१४च्या निवडणुकीत विकासाचा जयघोष करणारे मोदी २०१९च्या निवडणुकीत फक्त आणि फक्त भावनिक मुद्द्यांवर जोर देतात हे तितकेसे पटणारे नाही.



पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देऊ शकणारा एकही नेता देशात नाही. शेर अकेला आता है वगैरे गोष्टी निवडणुकीच्या सुरुवातीला सोशल मीडियावर जोरदार फिरत होत्या. मात्र, प्रत्येक राज्यात एक तुल्यबळ नेता नरेंद्र मोदींना आव्हान देतो आहे. प्रत्येक ठिकाणी त्या स्थानिक किंवा प्रादेशिक नेत्याशी लढताना मोदींना बरीच मेहनत करावी लागते आहे. आणि प्रत्येक ठिकाणी त्याच नेत्याविरुद्ध मोदींना संघर्ष करून विजय मिळवायचा आहे. कारण यंदा २०१४सारखी हवा नाही. प्रत्येक ठिकाणी त्यांना झगडावे लागत आहे. भरकटत जाणारे मुद्दे आणि प्रचारात फक्त मीठमिरचीसारखा आढळणारा विकासाचा मुद्दा त्याचेच द्योतक वाटते. 

२०१९च्या निवडणुकीत भाजपा २०० ते २२० फार तर २३०च्या आकड्यापर्यंत पोहोचेल, असा माझा वैयक्तिक अंदाज आहे. स्वबळावर त्यांना सरकार स्थापन करणे अवघड आहे. शिवाय आताच्या मित्रपक्षांप्रमाणेच नवे मित्रही शोधावे लागतील. 

भाजप १८० ते २०० पर्यंत अडकला तर नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायची शक्यता फारच कमी. २२० पेक्षा कमी जागा मिळाल्या तर नवे मित्र ज्या नावावर संमती दर्शवतील त्याच्या गळ्यात विजयाची माळ पडू शकते. मग ते नितीन गडकरी असतील किंवा राजनाथसिंहही असतील. २३०च्या आसपास भाजप पोहोचला तर नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार हे नक्की. आणि भाजप १८०च्या खाली अडकला तर मग राहुल गांधी, मायावती, ममता बॅनर्जी किंवा अगदी शरद पवारही पंतप्रधान होऊ शकतात…

(अमित शहा गुजरात निवडणुकीच्य वेळी करीत असलेला दावा आणि प्रत्यक्षात मिळालेल्या जागा यांचा निकष इथेही लावायचा झाला, तर दिल्ली ते गल्ली प्रत्येक भाजपा नेता-कार्यकर्ता ३०० जागा मिळतील, असा दावा करतोय. तेव्हा अमित शहा १५० जागांची बोली लावत होते आणि भाजपाला प्रत्यक्षात १०० जागा मिळाल्या. म्हणजे १५० ला ५० कमी. तोच निकष लावायचा झाला, तर भाजपाला ३००मधील १०० जागा कमी मिळतील, असे समजून चालायला हरकत नाही... ही आपली गंमत. असेच झाले तर लॉजिक.)


पाहू या काय होते… २३ मे अब दूर नही.