Showing posts with label Mobile. Show all posts
Showing posts with label Mobile. Show all posts

Wednesday, May 31, 2017

हरविलेल्या मोबाईलची लघुकथा…



प्रामाणिकपणाला तंत्रज्ञान आणि तत्परता यांची जोड मिळाली, तर काय घडू शकतं, याचा प्रत्यक्ष अनुभव नुकताच आला. केरळमधील एका माणसाचा मोबाईल मुंबईमध्ये हरविला आणि तो उत्तर प्रदेश किंवा बिहारहून आलेल्या व्यक्तीला सापडला. त्याने पुण्यात फोन करून संबंधित केरळी माणसाला संपर्क करण्याची विनंती केली. भाषेच्या अडचणीवर मात करून पुण्यातून केरळमध्ये संपर्क साधला गेला आणि संबंधित व्यक्तीच्या घरापर्यंत पोहोचण्यात आले. अखेर तीन-चार तासांच्या सव्यापसव्यानंतर हरविलेला मोबाईल मुंबईमध्येच संबंधित व्यक्तीला पुन्हा मिळाला... त्याची ही कहाणी…

काही वर्षांपूर्वी पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान हत्ती गणपती मंडळाने केरळमधील ‘पंचवाद्य’ वाजविणाऱ्या कलाकारांचा समावेश केला होता. त्यावेळी त्या ‘पंचवाद्य’ पथकाचा प्रमुख राजीव याच्याशी अगदी त्रोटक बोलणे झाले होते. तेव्हा त्याचा मोबाईल सेव्ह करून ठेवला होता आणि त्याने माझा. भविष्यात आमचा कधी संपर्क होईल, असे वाटलेही नव्हते. तीन वेळा केरळमध्ये गेलो, असलो तरीही कोट्टायमला निवांत जाणे झाले नव्हते. त्यामुळे त्याची भेट होऊ शकली नव्हती. राजीव कोट्टायममध्ये रहायला आहे.


मंगळवारी अचानक दूरध्वनी वाजला आणि ‘राजीव कोट्टायम’ असे नाव झळकले. मलाही आश्चर्य वाटले, या बाबाजीला माझी आता आठवण का झाली, अशा विचारानं फोन उचलला. समोरचा माणूस हिंदीतून बोलत होता. त्यानं हिंदीतून विचारला, हा फोन कोणाचाय? म्हटलं, राजीव म्हणून माझ्या ओळखीचे आहेत कोट्टायचमचे. त्यांचा आहे. 

समोरची व्यक्ती बोईसर येथून बोलत होती. रिक्षाचालक होता. प्रवेशसिंग उर्फ टायगर. त्याला राजीवचा मोबाईल मिळाला होता. तो बंद होता. त्यामुळे टायगरने स्वतःच्या मोबाईलमध्ये राजीवचे सीमकार्ड टाकून मला फोन केला. राजीवच्या कार्डावर यानं वीस-तीस रुपयांचं रिचार्जही मारलं होतं. ‘तुमच्याकडे या माणसाचा दुसरा नंबर असेल, तर त्यांना फोन करून सांगा. मोबाईल माझ्याकडे आहे. मला तो नको आहे. त्यांचा मोबाईल घेऊन मी काय करू. चांगला महागातला वाटतो. एलजी कंपनीचा आहे. १२-१५ हजारचा नक्की असेल. त्यांना माझ्या नंबरवर किंवा स्वतःच्याच नंबरवर फोन करायला सांगा, मी बोलतो त्यांच्याशी…’ असं सांगून टायगरनं बॉल (खरं तर मोबाईल) माझ्या कोर्टात टाकला. 

‘क्राइम पेट्रोल’ आणि ‘सावधान इंडिया’ पाहत असल्याने, आधी जरा धाकधूकच वाटत होती. राजीवचा फोन या रिक्षावाल्याकडे बोईसरला कसा आला, राजीवला काय झाले आणि असे अनेक प्रश्न मनात निर्माण झाले. आता मी काय करणार होतो. पण त्याच्या मोबाईलमध्ये आशिष नावाने माझा नंबर सेव्ह असेल. त्यामुळे तो पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर असावा, म्हणून मला रिक्षाचालकाने फोन केला. आधी एक-दोन जणांना फोन करून झाले होते. मात्र, ते सर्व मल्याळममध्ये बोलत होते. त्यामुळे टायगरला काही करता आले नसावे. त्याच्याशी हिंदीत बोलणारा मी पहिलाच असल्याने जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. 

  ज्याचा चेहरा दिसतोय, तो राजीव...

काय करायचे, हा प्रश्न माझ्यासमोर होता. कारण माझ्याकडे राजीवचा दुसरा क्रमांकही नव्हता. कोट्टायममध्ये माझा कोणताही रिपोर्टर मित्र किंवा ओळखीची व्यक्ती राहत नाही. मग राजीवच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचायचं कसं, असा प्रश्न माझ्यासमोर उभा ठाकला. फेसबुकवर कोट्टायम राजीव वगैरे सर्च मारून काहीच हाती लागेना. शेवटी राजीवचा नंबर गुगलवर टाकला आणि शोधलं. पहिल्या पानावर तळाशी एक ब्लॉग सापडला. राजीव ज्या सोसायटीमध्ये राहतो, त्या कॉलनीच्या सदस्यांची सर्व माहिती त्यावर दिली होती. कोट्टायमममधील ‘वड्डकेनाडा रेसिडन्ट्स वेल्फेअर असोसिएशऩ’ असं त्याच्या सोसायटीचं नाव. त्या सोसायटीमधील सर्व जणांची नावे असलेला ब्लॉग सापडला आणि थोडंसं हुश्श वाटलं. त्या सोसायटीमध्ये त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या दोन-चार जणांना फोन लावला. पण त्यांना हिंदी आणि इंग्रजी काही समजेना. ब्लॉगवरील माहितीनुसार काही जण ज्येष्ठ नागरिक होते, काही जण रोजंदारीवर काम करणारी मंडळी होती. एक वकील मिळाला. त्यांना फोन लावला, तर ते खूप बिझी होते. म्हणून त्यांनी बोलणं टाळलं. 


अखेरीस त्या सोसायटीत राहणाऱ्या बिजू नायर या पोलिस अधिकाऱ्याला फोन लावला. ते चिंगवनम पोलिस ठाण्यात कार्यरत होते. आता गोची अशी, की त्यांना हिंदी आणि इंग्रजी समजेना आणि मला मल्याळम येईना. त्यांच्या सहकाऱ्याशी बोललो. पण त्यालाही हिंदी नीट समजत नव्हते. मी त्यांना का फोन केला आहे, हे त्यांना समजत नव्हते आणि मला त्यांना सांगता येत नव्हते. त्यांना वाटलं, की मी चुकून त्यांना फोन लावलाय. त्यामुळं दोन-तीनदा राँग नंबर वगैरेही म्हणून झालं. अखेरीस एक कल्पना सुचली. 


आमच्या ऑफिसमध्ये KTजयरामन नावाचे एक गृहस्थ अॅडमिनमध्ये वरिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत आहेत. मी त्यांच्याकडे गेलो. सर्व परिस्थिती त्यांना समजावून सांगितली आणि संबंधित पोलिस अधिकाऱ्याशी चर्चा करण्याची विनंती केली. पुन्हा त्या पोलिस अधिकाऱ्याला फोन लावला आणि संवाद साधण्यासाठी जयरामन यांच्याकडे फोन दिला. दरम्यान, बिजू नायर यांनी तो फोन त्यांचे सहकारी अनीश यांच्याकडे दिला. पुढची पाच-दहा मिनिटे तो पोलिस अधिकारी आणि जयरामन यांच्यामध्ये मल्याळममधून संवाद साधला जात होता. नेमका गोंधळ काय झाला आहे, हे एव्हाना त्या पोलिस अधिकाऱ्याच्या लक्षात आले होते. सर्व पार्श्वभूमी आणि आम्हाला काय हवे आहे, हे समजल्यानंतर दोघांमधील संवाद यशस्वीपणे पूर्ण झाला. 
 

त्या पोलिस अधिकाऱ्याने तत्परतेने कुठल्या तरी कर्मचाऱ्याला त्या सोसायटीमध्ये राजीव यांच्या घरी धाडले असावे आणि माहिती दिली असावी. कारण दहाच मिनिटांनी मला राजीव यांच्या पत्नी इंदू यांचा दूरध्वनी आला. मुख्य म्हणजे त्यांना हिंदी व्यवस्थित नाही, पण समजण्याइतपत येत होते. त्यांचे पती म्हणजे राजीव हे मुंबईत ‘पंचवाद्य’ वाजविण्यासाठी दोन दिवसांसाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा दूरध्वनी हरवला होता. तसे त्यांनी पत्नीला सांगितलेही होते. मोबाईल ज्या रिक्षाचालकाकडे आहे, त्याचा नंबर मी राजीव यांच्या पत्नीला दिला. त्या रिक्षाचालकाच्या नंबरवर किंवा राजीव यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन करून रिक्षाचालकाशी बोलून घ्यायला सांगितले. हिंदीतून बोला, हे सांगण्याची गरज भासली नाही. 

इंदू आणि टायगर यांचे बोलणे झाले असावे, कारण रात्रीच्या सुमारास मला इंदू यांचा फोन आला आणि मोबाईल माझ्या मिस्टरांनी कलेक्ट केला, असे त्यांनी सांगितले. तेव्हा ‘साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण’ झाल्याचा आनंद मिळाला.

Tuesday, June 26, 2007

अद्ययावत तंत्रज्ञानाचा "शिवाजी'


सदैव लॅपटॉप जवळ बाळगून असणारा, गरीब व गरजूंना स्वस्तात शिक्षण मिळण्यासाठी परदेशातील भारतीयांकडून "मनी ट्रान्सफर'द्वारे पैसे गोळा करणारा आणि एमएमएस तसेच "स्पायकॅम' हे अद्ययावत तंत्रज्ञान हाताळण्यात पुरता सरावलेला नायक हे रजनीकांतच्या "शिवाजी द बॉस'चे वेगळेपण किंवा वैशिष्ट्य म्हटले पाहिजे.

परदेशात उच्च शिक्षण घेतल्यानंतर मिळालेली नोकरी सोडून पुन्हा भारतात परतलेला शिवाजी (रजनीकांत) हा चित्रपटाचा नायक आहे. तो अनेक वर्षे परदेशात राहिलेला असल्याने अद्ययावत तंत्रज्ञान त्याने आत्मसात केले असणे साहजिकच आहे. पण या गोष्टींचा चित्रपटामध्ये योग्य ठिकाणी उपयोग करुन कथानक अधिक रंजक केले आहे.

लॅपटॉपचा पासवर्ड हा एखादा शब्द नव्हे तर विशिष्ट पद्धतीने आवाज काढल्याशिवाय संगणकात "एन्टर'च करता येत नाही, हा तंत्रज्ञानातील पुढारलेपणाचे पहिले उदाहरण. त्याच्या या क्‍लृप्तीमुळेच पोलिस, सीबीआय व संगणक तज्ज्ञांनाही त्याचा पासवर्ड "हॅक' करता येत नाही. अवैध मार्गांनी पैसा जमविणाऱ्या अधिकाऱ्यांकडून काळा पैसा जमा करण्याची त्याची कल्पनाही वेगळी आहे. तुमच्याकडे किती काळा पैसा आहे, याची माहिती माझ्याकडे असून त्यापैकी निम्मा पैसा माझ्याकडे जमा करा. अन्यथा आयकर अधिकाऱ्यांकडे जाऊन मी माहित देतो, मग ते तुमचे सगळे पैसे काढून घेतील, ही शिवाजीची कल्पना चांगलीच लागू पडते.

शिवाय मोठ्या प्रमाणावर जमा झालेला काळा पैसा "व्हाईट' करण्याची त्याची शक्‍कलही अफाट आहे. परदेशातील भारतीय नागरिकांकडूनही शिवाजी पैसे जमा करतो, पण "मनी ट्रान्सफर'द्वारेच! जमा झालेला सगळा काळा पैसा तो अंडरवर्ल्डमधील मुस्लिम म्होरक्‍याकडे जमा करतो. त्यानंतर तो म्होरक्‍या अमेरिकेतील त्याच्या एजंटला कॉल करुन माझ्याकडे इतके रुपये जमा आहेत. तितक्‍या रकमेचे डॉलर्स तू अमूक अमूक माणसाच्या नावावर जमा कर, असे सांगतो. काळा पैसा अशा पद्धतीने चलनात येतो की नाही, माहिती नाही. पण असे घडत असल्यास ते अफाटच आहे.

अखेरच्या प्रसंगांमध्येही तंत्रज्ञान कसे कथानकाला उपयुक्त ठरु शकते ते आपण अनुभवतो. शिवाजी तुरुंगामध्ये असताना त्याचे तुरुंगातील काही हस्तक त्याला "एमएमएस' आणि "जीपीआरएस' सुविधा असलेला एक मोबाईल पुरवितात. त्याद्वारे तो साऱ्यांशी संपर्क साधतो. "एमएमएस' पाठवितो. पोलिस चौकीमध्ये शिवाजीच्या हस्तकाने छुपा कॅमेरा बसविलेला असतो. त्यातून पोलिस चौकीत घडणाऱ्या साऱ्या घटना शिवाजीच्या मोबाईलवर येत असतात. कल्पना म्हणून तरी ही नवीनच वाटते. शक्‍याशक्‍यतेच्या कसोटीवर हे असंभव वाटत असले तरी भविष्यात असे होणारच नाही, असा दावा कोणीच करणार नाही.

इतके अद्ययावत तंत्रज्ञान चित्रपटामध्ये असल्याने तो चित्रपट सध्याच्या जमान्यातील आहे, असे फक्त वाटतच नाही. तर नकळतपणे आपली त्याच्याशी नाळ जोडली जाते. वायफळ विनोद आणि फुटकळ कथानकाच्या आधारे झळकणारे मराठी, हिंदी चित्रपट पाहिल्यानंतर दाक्षिणात्य चित्रपटांमधील वैविध्य आणि पुढारलेपण सहज जाणवते. त्यासाठी का होईना शिवाजी एकदा पहाच.