Thursday, June 14, 2007

बंगाली वाघांना "साहेबाचे' मार्गदर्शन!


आशिष चांदोरकर ः सकाळ वृत्तसेवा

गुवाहाटी, ता. 10 ः ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि युरोपामध्ये रग्बीचा खेळ प्रचंड लोकप्रिय असला तरी भारतामध्ये रग्बी अजूनही प्राथमिक अवस्थेत आहे; पण भारतातही अनेक राज्य आणि खेळाडू चांगला खेळ करीत असून, खेळाडूंना प्रोत्साहन, चांगले मार्गदर्शन व "एक्‍स्पोजर' मिळाले, तर भारताकडेही आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्याची क्षमता निर्माण होऊ शकते, अशी प्रतिक्रिया इंग्लंडमधील माजी रग्बीपटू पॉल वॉल्श यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. ब्रिटिश उच्चायुक्तालयाचे माजी अधिकारी असलेल्या वॉल्श यांनी इंग्लंडमधील "क्‍लॉड' या कौंटीकडून रग्बी सामने खेळलेले आहेत. बंगालच्या रग्बी संघाचे तांत्रिक सहायक म्हणून ते स्पर्धेत सहभागी झाले आहेत. गेल्या चार वर्षांपासून ते कोलकता येथे आहेत. कोलकतामधील शालेय विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयीन तरुणांपर्यंत सर्वांमध्येच रग्बी लोकप्रिय आहे; तसेच तेथील रग्बीच्या स्पर्धांना तुडुंब प्रतिसाद मिळतो. रग्बीला मिळणारा पाठिंबा पाहून मी भारावून गेलो आणि बंगालच्या संघाबरोबर जोडला गेलो, अशी प्रतिक्रिया वॉल्श यांनी व्यक्त केली. भारतामध्ये बंगालप्रमाणेच महाराष्ट्र, तमिळनाडू आणि दिल्ली हे संघही तुल्यबळ असल्याचे सांगून वॉल्श पुढे म्हणाले, की जागतिक स्तरावर जाण्यासाठी भारताला अजूनही बरेच काही साध्य करायचे आहे. जागतिक स्तरावर रग्बी हा खेळ पंधरा खेळाडूंसह आणि सात खेळाडूंसह अशा दोन प्रकारे खेळला जातो. पहिल्या प्रकारात कौशल्य आणि दम महत्त्वाचा आहे. तर दुसऱ्या प्रकारात वेगवान हालचाली आणि विविध फॉर्मेशन यांच्यावर विजय अवलंबून आहे. दोन्ही ठिकाणी भारताला चांगली संधी मिळू शकते. प्रशांत महासागरातील सॅमोव्हा या वीस लाख लोकसंख्या असलेल्या देशाने बलाढ्य न्यूझीलंडला पराभूत करून "सेव्हन ए साईड' जागतिक रग्बी स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. मग भारताला काय अशक्‍य आहे.'' ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये ऍथलेटिक्‍सनंतर रग्बीच्या स्पर्धेला प्रेक्षकांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळाला होता. भारतातही जर अशाच पद्धतीने प्रतिसाद मिळाला तर काहीही अवघड नाही, असे वॉल्श यांनी नमूद केले. 2010 मध्ये दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रग्बीचा समावेश करण्यात आला असून, त्या स्पर्धेत सर्वोत्तम संघ निवडता यावा, यासाठी आशियाई क्रीडा स्पर्धा आणि त्यापाठोपाठ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रग्बीचा समावेश करण्यात आला आहे. भारतातील विविध संघ हा खेळ हळूहळू आत्मसात करीत असून, पोलिस आणि सेनादलाचे विविध संघ यांनी यामध्ये बऱ्यापैकी कौशल्य प्राप्त केल्याची माहितीही या वेळी समजली.

No comments: