कसला आलाय समाजावर
अन्याय
सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण
समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात
नकाराधिकाराचा (नोटा) वापर करावा…
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या
गोविंद कुलकर्णी, विश्वजित देशपांडे
आणि शाम जोशी
यांनी असे आवाहन नुकतेच केल्याचे वाचनात आले. कारण काय, तर महाराष्ट्रात
ब्राह्मणांच्या टक्केवारीच्या प्रमाणात कोणत्याच पक्षाने समाजाला प्रतिनिधीत्त्व
दिलेले नाही. कोणत्याच पक्षाने असे म्हणताना त्यांना भारतीय जनता पक्ष असेच म्हणावयाचे आहे, असे ठामपणे दिसून येते. कारण ब्राह्मण समाज हा मागील
काही काळात नेहमीच भाजपसोबत राहिला. मात्र, त्यांनीही समाजाला गृहित धरून
निवडणुकीची आखणी केली आहे काय… अशी शंका पत्रकात नमूद करण्यात आली आहे.
मुळात कुलकर्णी,
देशपांडे आणि जोशी यांनी यांच्या ब्राह्मण संघामागे पुण्यातील १८-१९ टक्के
ब्राह्मण समाजापैकी किती लोक आहेत, याचा खुलासा झालेला नाही. त्यामुळे अशा
ब्राह्मण संघटनांबद्दल सहानुभूती असली तरीही त्यांचे आवाहन ऐकण्याऐवजी केराची
टोपली दाखविणारे ब्राह्मणच पुण्यात अधिक मिळतील. मात्र, तरीही ब्राह्मण समाजावर
अन्यायाचा टाहो फोडून ‘नोटा’चा वापर करण्याचे आवाहन करणे, म्हणजे ब्राह्मण मतदारांना
विनाकारण संभ्रमात टाकण्यासारखे आहे. आता ही मंडळी हे आवाहन तिकिट नाकारलेल्या
कोणाएकाच्या सांगण्यावरून करीत आहेत की स्वतःहून करीत आहेत, ते माहिती नाही. मात्र,
अशा पद्धतीने ‘नोटा’ वापरण्याचे आवाहन करणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे.
मुळात ब्राह्मण
समाजाला टक्केवारीच्या तुलनेत प्रतिनिधीत्व मिळालेले नाही, हा ब्राह्मण महासंघाचा
दावाच चुकीचा आहे. विशेषतः भारतीय जनता पक्षाचा उल्लेख करून त्यांनी हे निवेदन
दिले आहे. शिवाय पुण्यातील भाजपच्या उमेदवारीवरूनच हे पत्रक जारी केले आहे.
त्यामुळे त्याच पक्षाविषयी बोलणे अधिक संयुक्तिक ठरेल. काँग्रेस, मनसे आणि इतर
पक्षांबद्दल इथे बोलण्याची आवश्यकता नाही.
महाराष्ट्रात साडेतीन
टक्के ब्राह्मण समाज आहेत, असे ढोबळपणे बोलले जाते. म्हणजे महाराष्ट्रात शंभर जागा
असतील, तर भाजपने ब्राह्मण समाजाला साडेतीन जागा दिल्या पाहिजेत. अर्थात,
महाराष्ट्रात ४८ जागा आहेत आणि भाजप फक्त २४ जागा लढवित आहे. समीकरण सोडविले, तर तो आकडा ०.८४ इतका येतो.
म्हणजे भाजपने महाराष्ट्रात ब्राह्मण समाजाला फक्त एक जागा द्यायला हवी. ती
त्यांनी मुंबईत दिली आहे, पूनम महाजन-राव यांना. मग ब्राह्मण महासंघाचा हा अनाठायी
टाहो कशासाठी? टक्केवारीनुसार वाट्याची एक जागा पदरात पडल्यानंतरही पुण्यात टक्केवारीची
सौदेबाजी करणाऱ्यांच्या मागे कोण आहे, हे पुढे आले पाहिजे.
पुण्यात साधारण तीन ते
साडेतीन लाख ब्राह्मण मतदार असावेत, असा अंदाज आहे. त्यामुळे पुण्यात पक्षांनी
ब्राह्मण उमेदवारांना प्राधान्य द्यावे, असे त्यांचे म्हणणे आहे. मुळात अशी मागणी
करणाऱ्या ब्राह्मण संघटनांना काही प्रश्न विचारावेसे वाटतात.
पहिले म्हणजे गेल्या
महापालिका निवडणुकीत उभ्या असलेल्या ब्राह्मण उमेदवारांच्या विजयासाठी तुमच्या
संघटनेने आणि महासंघाने काय आणि किती प्रयत्न केले, याचे स्पष्टीकरण कृपया द्या.
मनिषा घाटे, मेधा कुलकर्णी, नीलम कुलकर्णी, माधुरी सहस्रबुद्धे, मुक्ता टिळक,
श्याम देशपांडे यांच्या पत्नी, उदय जोशी, उज्ज्वल केसकर आणि जर कोणत्या ब्राह्मण उमेदवाराचे नाव चुकून घ्यावयाचे
राहिले असेल, तर ते सर्व. या उमेदवारांच्या विजयासाठी ब्राह्मण संघटनांनी काय
प्रयत्न केले. आमच्या महासंघाचा या उमेदवारांना पाठिंबा आहे आणि ब्राह्मण मतदारांनी त्यांनाच मतदान करावे, असे पत्रक तरी तुम्ही काढले होते का? मी घेतलेल्या माहितीनुसार शून्य. तशी खंत काही ब्राह्मण नगरसेवकांनी
सत्कार समारंभात बोलूनही दाखविली होती.
मुद्दा दुसरा म्हणजे ब्राह्मण
समाजावर सातत्याने प्रहार करणारी आणि समाजाबद्दल, ब्राह्मण महिलांबद्दल अतिशय वाईट
पद्धतीने अपप्रचार करणारी, साहित्य प्रसूत करणारी संभाजी ब्रिगेड ही संघटना अधूनमधून
डोके वर काढीत असते. तेव्हा या ब्राह्मण संघटना कोणत्या बिळात तोंड खुपसून
बसलेल्या असतात. ब्रिगेडच्या विखारी प्रचाराला आळा घालण्यासाठी तुम्ही काय पावले
उचललीत सांगणार का? न्यायालयाचा दरवाजा ठोठावला की प्रत्युत्तर देणारे साहित्य
निर्माण केले, की रस्त्यावर उतरून मोर्चा काढला… सांगा काय केले.
छत्रपती शिवरायांचे
गुरू दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लाल महालातून हटविण्याचे षडयंत्र रचले जात असताना
कुठे होते हे ब्राह्मण महासंघाचे देशपांडे, कुलकर्णी आणि जोशी. पुण्यात १८ ते १९
टक्के ब्राह्मण आहेत ना, पुण्यात मग त्यावेळी विरोध करण्यासाठी किती हजार ब्राह्मण
लोक रस्त्यावर उतरले होते. पुतळा हटविण्यास का नाही ताकद लावून विरोध केला. तेव्हा
रस्त्यावर कोण उतरले होते, शिवसेना-भाजपवालेच उतरले होते ना. रात्रभर जागून तिथे
ठिय्या मांडून कोण बसले होते. शिवसेना-भाजपवालेच बसले होते ना. तेच ब्रिगेडवाल्यांना आव्हान देत होते ना. जेव्हा जेव्हा
ब्रिगेडने दहशत करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
यांनीच आवाज टाकला ना. शिवाय ज्यांची वकिली करण्यासाठी तुम्ही पत्रक काढले आहे, ते मात्र, दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविला तेव्हा तिथे नव्हते. ब्राह्मण
असूनही. तेव्हा तुमची बोलती बंद झाली होती का?
(दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यात आल्यानंतर लिहिलेला ब्लॉग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
(दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यात आल्यानंतर लिहिलेला ब्लॉग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
शिवशाहीर आणि छत्रपती
शिवरायांवर अधिकारवाणीने बोलू शकतील, असे व्यक्तिमत्त्व असलेल्या माननीय बाबासाहेब
पुरंदरे यांना धमकी देण्यापर्यंत संभाजी ब्रिगेडची मजल गेली होती. तेव्हा सर्व ब्राह्मण
संघटना मिठाची गुळणी धरून का बसल्या होता. बाबासाहेबांच्या समर्थनार्थ का रस्त्यावर
उतरल्या नाहीत. ‘आम्ही आहोत त्यांच्या पाठिशी, हा दिलासा का दिला नाहीत तुम्ही.’
बोला उत्तर द्या.
चिपळूणच्या साहित्या संमेलनात परशुरामाच्या परशूचा आणि चित्राचा मुद्दा उपस्थित करून संभाजी ब्रिगेडने अपशकुन करण्याचा प्रयत्न केला. त्याविरोधात ब्राह्मण महासंघाने आवाज उठवून जोरदार आंदोलन का उभारले नाही. का दिले नाही रस्त्यावर उतरून आव्हान. गल्लीतील एखादी किरकोळ संघटनाही पत्रकबाजी करते आणि पेपरमध्ये बातमी छापून आणते. तुमच्या संघटनेची ताकद आहे ना, मग नेमक्या वेळी मूग गिळून गप्प का बसता.
फक्त पत्रकबाजी करून
बोलबच्चन करायला फारशी ताकद लागत नाही. मात्र, समाजावर होत असलेल्या
अन्यायाविरोधात आवाज उठवायला, प्रतिकार किंवा विरोध करायला संघटनेची ताकद लागते,
अंगात दम लागतो. ती ताकद आणि तो दम तुमच्याकडे आहे का, याचा विचार करा. भाजप आणि
शिवसेनेकडे तो दम, ती ताकद आणि ती हिंमत आहे. त्यामुळेच बहुतांश ब्राह्मण समाज याच
युतीच्या पाठिशी आहे. मध्यंतरी मनसेनेही ब्राह्मण मतदारांना पळविले. मात्र, राज
ठाकरे हे सुद्धा फक्त बोलघेवडे आणि कृतीशून्य असल्याचे स्पष्ट होत चालल्यानंतर
हळूहळू हा समाज पुन्हा पारंपरिक पक्षांकडे परतू लागला आहे. त्यामुळे नेमक्या वेळी अपशकुन करण्यासाठी तुम्ही कोणाची
सुपारी घेऊन हे पत्रक काढले, याचा खुलासा व्हायला हवा.
राहता राहिला, प्रश्न
अनिल शिरोळे यांचा. ते फक्त मराठा आहेत म्हणून त्यांना उमेदवारी दिलेली आहे, असा
तुमचा समज असेल, तर या आधीचा ब्लॉग जरूर वाचा. मग तुम्हाला समजेल बापटांचे तिकिट
कुणी आणि का कापले.
आणखी एक गोष्ट म्हणजे
शिरोळे हे मराठा असले तरीही विचारांशी आणि संघटनेशी पक्के आहेत. संघ परिवारातील पतित पावन
संघटना या आक्रमक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून
त्यांनी कामाला सुरुवात केली. १९७२
पासून ते एकाच विचारांशी एकनिष्ठ आहेत. संघबंदी
आणि आणीबाणीच्या काळात
‘मिसा’खाली त्यांनी
एक वर्षांचा तुरुंगवास
भोगला. अयोध्येच्या आंदोलनातही ते सहभागी होते. १९९२
पासून भाजपतर्फे नगरसेवक म्हणून
निवडून येत आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा लाडका, स्पष्ट विचार, स्वच्छ
प्रतिमा आणि अॅडजस्टमेंटला
विरोध करणारा नेता म्हणून शिरोळे ओळखले
जातात.
बेचाळीस वर्षे एकच
पक्ष आणि एकाच विचाराशी एकनिष्ठ राहणाऱ्या नेत्याच्या उमेदवारीच्या आड जातीचा
मुद्दा कसा काय येऊ शकतो, हे महासंघाचे पदाधिकार स्पष्ट करू शकतील काय. तुम्ही
काहीच स्पष्ट केले नाही, तरी हरकत नाही. ब्राह्ण मतदार हा सूज्ञ, हुशार, विचार
करून आणि सद्सद्विवेक बुद्धी वापरून मतदान करणारा समाज आहे. भांडारकर संस्थेवर
हल्ला करणाऱ्यांच्या, लाल महालातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटविणाऱ्यांच्या आणि
ब्राह्मण महिलांच्या लैंगिकतेबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लेखन करणाऱ्या प्रवृत्तींच्या
पाठिशी उभे राहण्यात ब्राह्मणांचे हित आहे का, हे समाजातील सूज्ञ मतदार चांगले जाणतात.
हिंदू समाजातील
जातीभेद दूर करण्यासाठी पहिल्यापासून प्रयत्न केले तसेच जातीभेद कधीच मानला नाही,
त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा मानणाऱ्यांच्या आणि राजकारणात ज्यांनी कधीही
जातीपातीला थारा दिला नाही, त्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या
वारसदारांच्या मागे ठामपणे उभे राहण्यात आपल्या समाजाचे हित आहे, न कळण्याइतका
ब्राह्मण समाज, मतदार मूर्ख नाही.
त्यामुळे तुम्हाला काय
पत्रकबाजी करायची ती करा. ब्राह्मण समाज नाराज आहे, असे म्हणायचे ते म्हणा. त्याचा
ब्राह्मण मतदारांवर त्याचा परिणाम होणार नाही.
आणि हे कसे विसरलातः
काँग्रेस आणि
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आयुष्यात जमणार नाही, असे मोठे काम बाळासाहेब
ठाकरे यांनी करून ठेवले आहे. साडेतीन टक्के म्हणजेच खरं तर मूठभर असलेल्या
ब्राह्मण समाजाच्या मनोहर जोशी यांच्या गळ्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची माळ घालण्याचे काम
बाळासाहेब ठाकरे यांनी केले. जातीची गणिते डोळ्यासमोर ठेवून दुसऱ्या कोणताही पक्ष
ही कामगिरी करूच शकणार नाही. बाळासाहेबांनी ते करून दाखविले. जातीपातीचा विचार न करता.
केंद्रात भारतीय जनता
पक्षाने अटलबिहारी वाजपेयी या ब्राह्मण माणसाला पंतप्रधानपदावर विराजमान केले.
अर्थातच, विचारांवरील निष्ठा आणि अखंड तपश्चर्या लक्षात घेऊनच.
त्यामुळे कोणत्या
पक्षांनी ब्राह्मण समाजावर अन्याय केला आहे किंवा नोटा वापरा. अमक्याला मत द्या. तमक्याला देऊ नका, हे सांगायला ब्राह्मण महासंघ आणि
संघटनांची गरज नाही. ब्राह्मण मतदार सूज्ञ आहे. तो सारासार विचार करूनच निर्णय घेईल.
12 comments:
चांदोरकरजी आपण जे लिहिले आहे ते यांना माहित नसेल असे नाही.पण ऐन वेळेस माघार,शेळपटपणा अशीही ब्राह्मणांची काही वैशिष्ठे सांगता येतील.
लेखनातील मुद्दे पटले.
तरीही इतर जातींप्रमाने ब्राह्मण समाजानेही एकी करुन राजकारण करुन दाखवावे, आपण इथेच कमी पडतो असे राहून राहून वाटते
अमोल
सुंदर आणि अप्रतिम रित्या अभ्यास करून लिहिलेला लेख.
जातीवरून राजकारण करणे ब्राम्हणांना जमले नाही आणि ते कधी करूही नये. अशा गोष्टींवरून तर नाहीच नाही. २-४ टाळकी एकत्र येउन भडकवण्याचा प्रयत्न करणार असतील तर आपण तेवढे मूर्खही नाही हे त्यांनी समजून घ्यावे.
पराग
अचूक लेख. जातीचे राजकारण आत्तातरी नको
शुभदा
छान..! सडेतोड लेखन... अभिनंदन..!
bramin aso maratha ... matrubhumisathi mara athva jiv ghya.. dustancha nash kara hich apli sanskriti
Khup chhan Dada. Lekh aawadla
This is a perfect mind of journalists. Just think about country. Not about cast.
Chandorjarji great.
खूप छान लेख लिहिला आहे
मुळातच ब्राह्मण लोकांनी विचार पूर्वक जातीय वाद मिटवला जावा ह्या साठी पर्यंत करणे गरजेचे आहे
हे सोडून अशा पद्धतीने नोटा चा वापर करणे एकदम चुकीचे आहे.नोटा केल्याने काही हि फायदा होणार नाही.
त्या मुळे हीच वेळ आहे विचारपूर्वक निर्णय करा
नाही तर ब्राह्मण महासंघाची किमत राहणार नाही
मी तर मतदान करणार
आपण हि करा
कोणाला करा हे सांगणार नाही आपण सुज्ञ आहात
व्वा लेखणी असावी तर अशी. एका पत्रकावरुन त्या कृतीमागे नेमकं काय राजकारण शिजतयं त्याचे अचूक विश्लेषण आणि पत्रक बहाद्दूरांचा घेतलेला खरपूस समाचार याला तोड नाही सर. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण लांबची गोष्ट हा ब्लॅाग वाचल्यावर ते त्यांच्या घरातही नाटो अधिकार वापरा असे सांगण्याचे धाडस करणार नाहीत.
छान आशिष, ब्राम्हण असूनही आपण चांगल्या शब्दात ह्या बाजीराव लोकांचा समाचार घेतला. मराठा आणि मारवाडी लोकांची नोकरी करून स्वताची तुंबडी भरणारे ब्राम्हण पत्रकारच सध्या जास्त आहेत. आपल्या सारख्या पत्रकाराची गरज आहे. मराठा राज्य बुडवणारे, मोहलाची आणि इंग्रजांची लाचारी पत्करणाऱ्या लोकाना खडे बोल सुनावाल्य्बद्दल धन्यवाद.
अतिशय अभ्यासपूर्ण लेख. माझी किंवा माझ्या मुलाची जात कुठेही नोंदवलेली नाही. मी जात मानत नसलो तरी जात न मानणाऱ्या तथाकथित पुरोगामी लोकांप्रमाणे धर्म नाकारत नाहीत. आमच्या घरात कोणतीही कर्मकांडे होत नसली तरी मी हिंदू आहे आणि इतर धर्माबद्दल मला आस्था असली तरी माझ्या धर्माचा मला तेवढाच अभिमान आहे. हिंदू धर्म जाती-पातींमुळे आधीच पोखरला आहे. अशा परिस्थितीत ब्राह्मणांनी तरी असे समाजात फूट पडणारे वाद उकरून काढू नयेत. ५० वर्षांपूर्वी ब्राह्मणांची स्थिती खूपच वाईट होती; त्यात आता खूपच सुधारणा झाली आहे. ब्राह्मणांनी नोकऱ्यांमध्ये आरक्षण न मागता नोकऱ्या देणारे व्हावे; त्यांची तेवढी कुवत आहे.
Post a Comment